विश्वास पाटीलकोल्हापूर : प्राध्यापक नियुक्तीसाठीच्या देवघेवीचा आकडा पन्नास लाखाच्या पुढे उड्या मारत असतानाच प्राचार्य पदासाठीही सरासरी पंचवीस लाख रुपये मोजावे लागत असल्याचे अनुभव आहेत. यासाठी एक यंत्रणाच कार्यरत असून शिक्षण खाते, संस्था व विद्यापीठातील काही पदाधिकारी यांची एक साखळीच तयार झाली आहे. त्यामध्ये एका महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आघाडीवर असून त्यांचा वावर कॉलेजमध्ये कमी आणि विद्यापीठ आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयात जास्त असतो असे चित्र आहे.शासनाने स्वायत्त महाविद्यालयामध्ये काही अटीवर प्राध्यापकांच्या जागा भरण्यास परवानगी दिली आहे त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, पण यामध्ये सुद्धा काही लोकांनी हात धुवून घेतले आहेत. संस्थांचे तर उखळ पांढरे होतच आहे. पण, कुलगुरूंचे प्रतिनिधी, निवड समिती सदस्य, त्याचबरोबर शासकीय प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी यांचीही दुकानदारी जोरात सुरू आहे. ही उलाढाल प्रत्येक पदामागे ५० लाखांपर्यंत होत आहे. कोल्हापुरातीलच एक अनुभव : एका महाविद्यालयात प्राचार्य भरतीसाठी उमेदवाराने तब्बल २५ लाख रुपये मोजल्याची चर्चा आहे.या पदाच्या निवडीसाठी असलेल्या तज्ज्ञांनाही मोठा लाभ झाला. संबंधित प्राचार्य महिनाअखेरीस निवृत्त होणार होते आणि मुदत संपत आल्याने त्यांचा जीव कासावीस झाला होता. विद्यापीठाचे प्रतिनिधी, विषय तज्ज्ञ, शासकीय प्रतिनिधी हे मुलाखतीची तारीखच द्यायला तयार नव्हते. शेवटी त्यांचाही खिसा गरम केल्यावर त्यांनी तारीख दिली आणि ते प्राचार्य म्हणून आता काम करत आहेत.तज्ज्ञ समितीत नाकाने 'कणसे' सोलणारे एक प्राचार्य आघाडीवर आहेत. गेल्या चार वर्षांत अनेक ठिकाणी ही व्यक्ती जात आहे. प्रत्येक ठिकाणी हे एकच कसे काय प्रतिनिधी अशी विचारणा काही प्राचार्य करू लागले आहेत.
सध्या एका महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची चर्चा शैक्षणिक वर्तुळात जोरात सुरू आहे. हे महाशय महाविद्यालयात कमी पण सकाळी कर्मचारी कामावर हजर होण्याआधी हे विद्यापीठात हजर असतात. अनेक विभागांना भेटी देऊन झाल्यावर ते शिक्षण सहसंचालक कार्यालयात जातात.विद्यापीठातील पदभरती मान्यता व निवड समिती मान्यता देणाऱ्या विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्याची चांगली मर्जी होती. हे महाशय कोणत्या महाविद्यालयात जागा भरायच्या आहेत. कोठे तज्ज्ञांची समिती नेमली आहे. यामध्ये सदस्य कोण कोण आहेत यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो आणि मग त्याप्रमाणे हे उमेदवार गाठून पुढील जोडण्या लावतात.मध्यंतरी कराडच्या एका महाविद्यालयाच्या मुलाखतीमध्ये या महाशयांनी घातलेला गोंधळाच्या तक्रारी कुलगुरूंपर्यंत गेल्या. तरी ही व्यक्ती अजून विद्यापीठातच घुटमळत असते हे विशेष. यांचे कारनामे बघून संस्थेने त्यांना प्रभारी प्राचार्य पद तीन वेळा नाकारले. विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांचा उपयोग करून प्रभारी प्राचार्यपद आपल्याकडेच ठेवले आहे.