कोल्हापूर : एखादी अनेक ठिकाणी फिरून आलेली व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह आली की मग प्रशासन आणि आरोग्य विभागावर कसा ताण येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून शाहूवाडी तालुक्यातील ‘उचत’च्या रुग्णाकडे पाहिले जाते. कारण या युवकाला तपासलेल्या सरुडच्या डॉक्टरांनी नंतरच्या काळात पावणेदोनशे रुग्णांची तपासणी केल्याने या सर्वांचीच तपासणी करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे.
दिल्लीच्या मरकज कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तिंची यादी दिल्लीतून मुंबईमार्गे येथील जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने तातडीने या सर्वांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवता आले. ही यादी जर मिळाली नसती तर यातील अनेकजण नंतर काही कालावधीनंतर रुग्ण झाल्याचे स्पष्ट झाले असते.
या सर्वांना पन्हाळा येथे ठेवण्यात आले होते. त्यातील उचतच्या ३० वर्षांच्या युवकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर मग मात्र प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली. कारण दिल्लीहून सांगली, उदगावला थांबून, कोल्हापूर मुक्काम, मग वाहनाने मलकापूर तेथे मुक्काम, नोकरीच्या ठिकाणी, घरी, सासुरवाडीला अशा अनेक ठिकाणी फिरलेल्या या युवकांच्या संपर्कातील नागरिक शोधताना नाकी नऊ आले.
या युवकाच्या थेट संपर्कामध्ये ६१ जण आले होते. त्या सर्वांची तपासणी झाली असून, त्यातील ४३ संस्थात्मक, तर १८ घरगुती अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहेत. या थेट संपर्कामध्ये आलेल्या सर्वांची माहिती घेताना हा युवक डॉक्टरांकडे तपासण्यासाठी गेला होता. त्यामुळे त्या डॉक्टरांची आणि त्यांनी तपासलेल्या पावणेदोनशे रुग्णांची तपासणी करावी लागली आहे. शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. सुदैव म्हणजे यातील बहुतांशी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळेच अजूनही अशा पद्धतीने कुणी बाहेरून आले असेल तर त्यांनी आपणहून तपासणी करून घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
आईच्या संपर्कातील ७८ जणांची तपासणीया युवकाच्या आईचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चौकशी सुरू झाली. हा आकडा ७८ इतका असल्याने संपूर्ण गल्लीच गेल्या दोन दिवसांमध्ये तपासणीसाठी सीपीआरला आणण्यात आली होती.