कोल्हापूर : कारवाईच्या कचाट्यात अडकलेल्या महानगरपालिकेतील २० नगरसेवकांनी निवडणूक आयोगास जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत न सादर केल्यामुळे शनिवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन ‘साहेब आम्हाला वाचवा,’ अशा शब्दांत साकडे घातले. विभागीय जातपडताळणी समितीनेच जातवैधता प्रमाणपत्रे उशिरा दिली आहेत. त्यात आमची कोणतीही चूक नसल्याचा दावा या नगरसेवकांनी यावेळी केला. जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या नगरसेवकांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात दिल्यामुळे महानगरपालिकेतील महापौर हसिना फरास यांच्यासह २० नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी पद वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापुरात असल्याची संधी साधून या नगरसेवकांनी महापौर फरास यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी मुक्कामास असलेल्या हॉटेलवर पवार यांची भेट घेतली. महापौर फरास, माजी नगरसेवक आदिल फरास यांनी नगरसेवकांची कैफियत मांडली. निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगास सादर करण्याचे बंधन आहे, हे जरी खरे असले तरी विभागीय जातपडताळणी समितीनेच सुनावणीला उशीर लावला व उशिरा प्रमाणपत्रे दिली. त्यात आमचा दोष नाही. कामाच्या बोजामुळे वेळेत निकाल देता आलेला नाही, असा स्पष्ट उल्लेख समितीच्या लेखी पत्रात आहे, असे फरास यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. शिष्टमंडळात महापौरांसह विरोधी पक्षनेता किरण शिराळे, माजी उपमहापौर शमा मुल्ला, नगरसेविका वृषाली कदम, अश्विनी बारामता, दीपा मगदूम, संदीप नेजदार, सचिन पाटील, अफझल पिरजादे, कमलाकर भोपळे, विजय खाडे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)पवारांचे आश्वासनमुदतीत प्रमाणपत्र न देणाऱ्यांमध्ये भाजप-शिवसेनेचे नगरसेवक आहेत का, अशी विचारणा पवार यांनी केली. महापौर फरास यांनी त्यांच्या आठ नगरसेवकांचा समावेश असल्याचे सांगितले. त्यावर स्वत: फडणवीस यांच्याशी बोलून कायदेशीर संरक्षण कसे देता येईल हे पाहतो, असे आश्वासन पवार यांनी दिले.
वीस नगरसेवकांचे साकडे
By admin | Published: January 28, 2017 11:45 PM