सांगली : राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने चौथी आणि सातवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला़ जिल्ह्यातील चौथीचे सात आणि सातवीचे तेरा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले़ गुणवत्ता यादीत शेडगेवाडी येथील सरस्वती विद्यामंदिरच्या चौथी आणि सातवीच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ चौथीचा ५३, तर सातवीचा ४२.३२ टक्के निकाल लागला असून ८७२ जण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले़परीक्षा परिषदेच्यावतीने एप्रिलमध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आली होती़ सातवी शिष्यवृत्तीसाठी चोवीस हजार ५३५ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १० हजार ३८२ उत्तीर्ण झाले़ दोन हजार ३३५ विद्यार्थ्यांना साठ टक्क्यांपेक्षा जादा गुण मिळाले असून ४३६ विद्यार्थ्यांना शिष्यृवत्ती मिळणार आहे़ चौदा हजार ८३० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले़ राज्याच्या गुणवत्ता यादीत ग्रामीण भागातील नऊ विद्यार्थी चमकले़ श्रेयस यादव याने २७८ गुण (जि़ प़ केंद्र शाळा, बोरगाव) राज्यात चौथा क्रमांक मिळविला़ दर्शन निकम २७६ गुण (पागे विद्यामंदिर, चिंचणी) पाचवा, इन्शा जावेद मगदूम (विद्यानिकेतन स्कूल, साखराळे), अभिजित रघुनाथ जाधव (यशवंत विद्यामंदिर, शिराळा) आणि आयुती सुदीप चौगुले (सेकंडरी हायस्कूल, भिलवडी) या तिन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी २७४ गुण मिळवून सहावा क्रमांक मिळविला़ अनिकेत पाटील २७२ गुण (गुरुदेवा कुंज स्कूल, शिराळा) सातवा, जमीर मुजावर २६८ गुण (आश्रमशाळा, ढालगाव) ९ वा, राजन पाटील २६६ (सिद्धनाथ हायस्कूल, आरवडे) व प्रथमेश आष्टे (सरस्वती विद्यामंदिर, शेडगेवाडी) या दोघांनी प्रत्येकी २६६ गुण मिळवून दहावे स्थान मिळविले़ गुणवत्ता यादीत संकेत संभाजी साळुंखे २७८ गुण (दादोजी स्कूल, तासगाव) याने सहावा, अभिजित पाटील २७४ गुण (भारती विद्यामंदिर, विटा) आठवा, रिद्धी पाटील (कमलाबाई विद्यालय, इस्लामपूर) आणि ऋषिकेश केंभावी (सांगली हायस्कूल, सांगली) यांनी राज्यात दहावे स्थान पटकाविले़ (प्रतिनिधी)
वीस विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत
By admin | Published: July 24, 2014 11:25 PM