कोल्हापूर : कोणत्याही रुग्णाच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेचा मागील दोन दिवसांत आजरा तालुक्यातील एका कोविड रुग्णाला विचित्र अनुभव आला. दोन्ही रुग्णवाहिकेतील डिझेल संपल्याने चालकाला कॅन घेऊन पंपावर जावे लागले व तोपर्यंत रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांची मात्र अस्वस्थता वाढली.घडले ते असे : परवाच्या रविवारी (दि १४) आजरा ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी एका रुग्णास गडहिंग्लजला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. रुग्णाच्या नातेवाईकांनी १०८ नंबरला कळविल्यावर तातडीने रुग्णवाहिका आली. पेशंटला त्यात घेतल्यानंतर फर्लांगभर अंतरावर गेल्यावर ती बंदच पडली. गाडीतील इंधन मीटरचा काटा गाडीची टाकी फुल्ल असल्याचे दर्शवत होता. प्रत्यक्षात डिझेल संपले होते. मग चालक रुग्णांच्या नातेवाईकांसोबत जावून कॅनमधून डिझेल घेऊन आला व मगच रुग्ण पुढे मार्गस्थ झाला.दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. १५) उपजिल्हा रुग्णालयाने रुग्णास सीपीआरला हलविण्याची सूचना केली. पुन्हा १०८ ला कळविल्यावर तातडीने रुग्णवाहिका आली परंतु कोगनोळी चेकपोस्टच्या पुढे आल्यावर गाडी रस्त्यातच बंद पडली. त्यावेळीही गाडीतील डिझेल संपले होते. चालकाने दुसरी रुग्णवाहिका बोलावून घेतली व त्यातून जाऊन डिझेल आणल्यानंतरच गाडी कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.
या सगळ्या प्रकारात तासभराहून जास्त वेळ झाला. त्यामुळे कोगनोळीहून सुटल्यावर वाहकाने गाडी एवढ्या जोरात सोडली की गतिरोधकावरून जाताना जोरात आदळली व त्या धक्क्याने रुग्णासह स्ट्रेचरही मागील दरवाजा तोडून बाहेर जाताजाता वाचले. सुदैवाने या विलंबाचा रुग्णाच्या प्रकृतीवर फारसा परिणाम झाला नाही परंतु हेच एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाच्या बाबतीत घडले असते तर...