कोल्हापूर : एखाद्या बहिणी जुळ्या असू शकतात. त्या दिसायलाही एकसारख्याच असतील. पण, एखाद्या परीक्षेत त्यांना गुणही समानच मिळाले तर मात्र, ऐकावे ते नवलच असंच म्हणावं लागेल. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूलमधील पुण्यदा सुधांशू नाईक व भाग्यदा सुधांशू नाईक या जुळ्या बहिणींना दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के असे समान गुण मिळाले आहेत. यातील तीन विषयांमध्ये दोघींनी समान गुण प्राप्त केले. पुण्यदा व भाग्यदा या ताराराणी विद्यापीठाअंतर्गत उषाराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. आठवीपर्यंत त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असून, पुढे त्या सेमी इंग्लिशमधून प्रवेशित झाल्या. दहावीच्या परीक्षेत या दोघींनीही उषाराजे हायस्कूलमध्ये विभागून द्वितीय क्रमांक मिळविला. पुण्यदाला पुढे मायक्रोबायोलॉजी करायचे असून, क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदवी घेण्याचा भाग्यदाचा मानस आहे. विशेष म्हणजे या दोघीही कथ्थक नृत्य शिकत असून, यातील चार परीक्षाही त्यांनी दिल्या आहेत.ट्रेकिंग, गडकिल्ल्यांची आवडसुधांशू नाईक हे दक्षिण आफ्रिकेत नोकरीस आहेत. त्यांच्या दोन्ही मुली या पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार. विशेष म्हणजे दोन्ही बहिणींना ट्रेकिंग, गडकिल्ले फिरण्याची प्रचंड आवड आहे. आपल्या आवडी-निवडी जपत त्यांनी या परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. मुलींनी मिळविलेल्या या यशाचे कौतुक असल्याचे सुधांशू नाईक यांनी सांगितले.
दहावी परीक्षेत कोल्हापुरातील जुळ्या बहिणींना समान गुण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 4:12 PM