कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या एकूण १५७८ शाळा बुधवारपासून भरल्या. तब्बल दहा महिन्यांनंतर या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. दोन सत्रांमध्ये वर्ग भरले. या शाळांनी विद्यार्थ्यांच्या बॅचेसनुसार एक दिवसआड त्यांचे वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे.कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून या शाळा बंद झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने शाळांना परवानगी दिली. वर्ग सुरू होणार असल्याची सूचना विद्यार्थी, पालकांना गेल्या दोन आठवड्यापूर्वी मिळाली. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून विद्यार्थी शाळेत येऊ लागले.
हमीपत्र दिलेल्या विद्यार्थ्यांची थर्मल गनने तपासणी करून त्यांना वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. त्याठिकाणी कोरोनाचे नियम, अभ्यासक्रम, वर्ग कोणत्या सत्रात आणि कोणत्या दिवशी भरणार, आदी स्वरूपातील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था होती.