जयसिंगपूर : शहराच्या विकासासाठी शाहू आघाडी व ताराराणी आघाडीने सहमतीची भूमिका घेऊन एकत्र काम करणार असल्याचा निर्णय घेतल्यानंतर उपनगराध्यक्ष कक्ष विस्ताराचा मार्ग मोकळा झाला होता. जयसिंगपूर पालिकेत उपनगराध्यक्ष कक्षाचे विस्तारीकरण करण्यात आले असून, तो सुसज्ज झाला आहे. जयसिंगपूर नगरपालिकेत ताराराणी आघाडीकडे नगराध्यक्ष पद तसेच दहा सदस्य आहेत. राजर्षी शाहू विकास आघाडीकडे पंधरा सदस्य असून, दोन अपक्ष सदस्यही निवडून आले आहेत. जयसिंगपुरात विकासकामांचा डोंगर उभारू, अशी ग्वाही शाहू व ताराराणी आघाडीने प्रचारादरम्यान दिली होती. निवडणुकीत नगराध्यक्ष पद ताराराणी आघाडीकडे, तर बहुमत शाहू आघाडीला मिळाले होते. या दोन्ही आघाडीत सुरुवातीपासूनच तू-तू, मै-मै सुरू झाली होती. उपनगराध्यक्षांच्या कक्षाच्या विस्तारावरून आणखी वाद वाढला होता. पालिकेत उपनगराध्यक्ष व महिला बालकल्याण समिती सभापती कक्ष एकमेकांलगत होते. ही दोन्ही पदे शाहू आघाडीकडे असल्यामुळे उपनगराध्यक्ष व महिला बालकल्याण कक्ष या दोन्हीमधील पार्टीशियन काढून टाकण्यात आले होते. यावर ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी आक्षेप घेऊन कक्ष विस्तारीकरणाचे काम बंद पाडले होते. सुमारे दीड महिने हा वाद सुरू होता. अखेर १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी मध्यस्तीची भूमिका घेत ताराराणी आघाडी व शाहू आघाडी यांच्यातील या वादावर तोडगा काढला. दोन्ही आघाडीतील नगरसेवकांबरोबर समन्वय साधून उपनगराध्यक्ष कक्ष व महिला बालकल्याण कक्ष स्वतंत्र करून देण्याचा निर्णय दिला होता. यामुळे उपनगराध्यक्ष कक्ष विस्तारीकरणाचा प्रश्न सभेपूर्वीच निकालात निघाला. दरम्यान, उपनगराध्यक्ष कक्ष विस्तारीकरण करून सुसज्ज असा करण्यात आला आहे. एकूणच शहराच्या विकासासाठी दोन्ही आघाड्यांनी समझोत्याची भूमिका घेतल्याने शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)
जयसिंगपुरात दोन्ही आघाडीत समझोता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:44 AM