(राज्य पानासाठी) राम मगदूम। गडहिंग्लज (कोल्हापूर) ‘महावितरण’च्या गडहिंग्लज विभागीय कार्यालयाअंतर्गत साकारण्यात आलेल्या तीन प्रकल्पांत मिळून १७ महिन्यांत २८ लाख ६२ हजार युनिट विजेची निर्मिती झाली. १० जुलै २०१९ ते २२ डिसेंबर २०२० या काळातील ही वीजनिर्मिती आहे. प्रचलित वीज दरानुसार त्याची किंमत सुमारे अडीच कोटी इतकी होते. ‘एनर्जी इफिशियन्शी सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीसोबत महावितरणने केलेल्या वीज खरेदीच्या करारानुसार हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात आणि त्यांच्या सोयीनुसार वीजपुरवठा व्हावा, त्यासाठी ३ वर्षांपूर्वी युती शासनाच्या काळात ही योजना सुरू झाली. मुख्यत: कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा, यासाठीच ही योजना आहे. त्याअंतर्गत ‘महावितरण’च्या गडहिंग्लज विभागीय कार्यालय व हलकर्णी, चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील शाखा कार्यालयाच्या परिसरात खुल्या जागेत हे प्रकल्प राबविण्यात आले आहेत. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज गडहिंग्लज तालुक्यातील नूल व नांगनूर, आजरा तालुक्यातील उत्तूर व चंदगड तालुक्यातील वैजनाथ या कृषी वाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांना पुरवली जाते. कोल्हापूर परिमंडळातील हे पहिलेच यशस्वी प्रकल्प आहेत. त्यासाठी एकूण ९.२५ कोटी रुपये खर्ची पडले आहेत.
-----------------------------------
* दृष्टिक्षेपात प्रकल्प असे * गडहिंग्लज - वीजनिर्मिती क्षमता १.००६ मेगावॅट, सोलर टेबल संख्या - १४३, खर्च ४ कोटी
* हलकर्णी - वीजनिर्मिती क्षमता ०.७५ मेगावॅट, सोलर टेबल संख्या - १०५, खर्च ३ कोटी
* शिनोळी - वीजनिर्मिती क्षमता ०.५४७ मेगावॅट, सोलर टेबल संख्या - ७८, खर्च २.२५ कोटी
-----------------------------------
* फोटो ओळी : महावितरण कंपनीच्या गडहिंग्लज विभागीय कार्यालयाच्या परिसरातील खुल्या ४ एकर जागेत साकारण्यात आलेला सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प.
क्रमांक : २५१२२०२०-गड-०२