लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची एफआरपी थकवल्याने बँकेने जप्त केलेली २ लाख ५३ हजार पोती गोदामामधून गायब असून, हिंमत असेल तर संचालक मंडळाने गोदाम उघडून शेतकऱ्यांना दाखवावे, असे आव्हान कारखान्याचे माजी संचालक व भीमा बचाव सघर्ष समितीचे शिवाजी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. चव्हाण म्हणाले, चार मंत्र्यांना डावलून दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी धनंजय महाडिक यांना संधी दिली. पहिल्या पाच वर्षांत आपणही संचालक होतो, त्यावेळी चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठवल्याने पुढील निवडणुकीत बाजूला केले. शेतकऱ्यांची २६ कोटींची एफआरपी थकीत आहे, त्यापोटी बँकेने २ लाख ५३ हजार पोती साखर जप्त केली. मात्र तेवढी साखर आता गोदामात नाही. कामगारांचा २३ महिन्यांचा पगार दिलेला नाही. ट्रॅक्टर मालकांना फसवून बँक ऑफ इंडिया शाखा कुरुलकडून कर्ज घेतले आहे. ठिबक सिंचनसाठी शेतकऱ्यांच्या बिलातून कपात केलेले पैसे बँकेत भरलेले नाही. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या सात-बारावर ‘आयडीबीआय’ बँकेतून लाखो रुपयांची उचल केली आहे. कामगारांच्या पगारातून कर्जाचे हप्ते वसूल केले, मात्र ते पतसंस्थेत भरले नाहीत. अशा विविध मार्गाने शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम धनंजय महाडिक यांनी केले. आता आमचे सभासदत्व रद्द करण्याच्या नोटिसा लागू केल्या आहेत. यावेळी सुस्तेचे माजी सरपंच बाळासाहेब लोकरे, सतीश भोसले उपस्थित होते.
महाडिकांसाठी सतेज पाटीलही प्रचारात हाेते
भीमराव महाडिक यांनी पॅनेल उभे केले होते, त्यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटीलही त्यांच्या प्रचारासाठी मोहोळमध्ये आले होते. त्यामुळे कोल्हापूरचे राजकारणाशी आमचे देणे-घेणे नाही. धनंजय महाडिक यांनी ‘भीमा’ कारखान्याबाबत कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतल्याने आम्हाला येथे येऊन बोलावे लागल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
महाडिकांसारखे रंग कोणी बदलू शकत नाही
धनंजय महाडिक यांनी ‘भीमा’च्या २२ हजार सभासदांचे वाटोळे केले. त्यांच्यासारखे रंग कोणी बदलू शकत नाही. शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे न्याय मागितला होता. त्यांनी चांगले सहकार्य केले; मात्र साखर आयुक्त कार्यालयाचे काम संथ गतीने सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्षेत्राबाहेरील १६७८ सभासद
कारखाना मोहोळचा आणि सभासद सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील आहेत. ज्यांचा कारखान्याशी काडीचाही सबंध नाही, अशा कार्यक्षेत्राबाहेरील १६७८ सभासदांना कमी करण्यासाठी आमची लढाई सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.