कोल्हापूर : साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी सुमारे दोन लाख ४० हजार रुपये घेऊन कराराप्रमाणे कामगार न पुरवता फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुकादम अंकोश मानू राठोड (३८, रा. वरुड लोणी गोऑली, ता. महेकर, जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा फसवणुकीचा गुन्हा करवीर पोलीस ठाण्यात दाखल केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,२०१९-२०२० या साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करण्यासाठी मधुकर पांडुरंग पाटील (५१, रा. हळदी, ता. करवीर) व संशयित राठोड यांच्याबरोबर ट्रॅक्टरवर ऊस तोडणी मजूर पुरविण्यासाठी करार झाला. त्यामध्ये २० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर पाटील याने ६ नोव्हेंबर २०१९ मध्ये कोल्हापूरातील आर.बी.एल. बँक शाखा हळदी येथून संशयित आरोपी मुकादम राठोड याच्या बँक ऑफ इंडिया शाखा फर्ग्युसन (पुणे) येथे खात्यावर २ लाख ४० हजार रुपये एन.एफ.टी.द्वारे पाठविले. संशयित आरोपीने कराराप्रमाणे पैसे स्वीकारून ऊस तोड मजूर पुरविले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी पाटील यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्यात मुकादम अंकोश राठेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.