कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ४९३ नागरिक व्याधीग्रस्त आढळले आहेत. या नागरिकांचे व ६० वर्षांवरील व्यक्तींचे पुन्हा महाआयुष्यअंतर्गत सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज रुग्णांची संख्या १५०० ते १९०० च्या आसपास असून, मृत्यूचे प्रमाण सरासरी ५० इतके आहे. यातील वयोवृद्धांचा मृत्यूदर ५३ टक्के, तर ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचे प्रमाण २० टक्के आहे. हा रुग्णवाढीचा दर व मृत्यूदर कमी व्हावा यासाठी जिल्हा, महापालिका व जिल्हा परिषदेच्यावतीने सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत आता पुन्हा एकदा या वयस्कर नागरिकांचे, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचे सर्वेक्षण केले जात आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी व लक्षणे असली तर कोराेना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे लक्षणे नसलेले सुपरस्प्रेडरमुळे हाेत असलेला संसर्ग आटोक्यात येणार आहे. तर उपचारासाठी उशिरा दाखल झाल्याने होणारे मृत्यू रोखणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
---
तालुका : व्याधीग्रस्त नागरिक
आजरा : १० हजार ६१३
भुदरगड : १२ हजार ४२८
चंदगड : १२ हजार ०१३
गडहिंग्लज : १३ हजार ९२६
गगनबावड़ा : १ हजार ७१४
हातकणंगले : २७ हजार ४२४
करवीर : १३०
कागल : १५ हजार ५१०
पन्हाळा : १३ हजार ०७८
राधानगरी : २० हजार २५०
शाहूवाडी : १० हजार २५५
शिरोळ : १६ हजार ६४५
शहरी विभाग : ३९ हजार ४९३
कोल्हापूर महापालिका क्षेत्र : ५० हजार ४
एकूण जिल्हा : २ लाख ४३ हजार ४९३
--
एकूण कुटुंब संख्या : ८ लाख ८९ हजार १८९
सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या : ८ लाख ८४ हजार ९३५
सर्वेक्षणासाठीची पथके : २६
पथकातील कर्मचारी : २ हजार २६०
---
सारी, इलीचे पाच हजार रुग्ण
महापालिका व जिल्हा परिषदेच्यावतीने ऑक्टोबर महिन्यात केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात सारीचे २२६ व इली आजाराचे ४ हजार ७८२ रुग्ण आढळून आले.
--
पुढे काय
फेरसर्वेक्षणातून या नागरिकांची माहिती मिळाल्यानंतर त्यातील किती व्याधीग्रस्तांनी अजून लस घेतलेली नाही, याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.
---