इचलकरंजी : बनावट नोटा छपाईप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. राजूभाई इस्माईल लवंगे (वय ५५, रा. शाहू गल्ली कळंबे तर्फ ठाणे, ता. करवीर) व आंबाजी शिवाजी सुळेकर (४२, रा. पासर्डे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध किमतीच्या एकूण दहा लाख ५४ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा, कॉम्प्युटर, प्रिंटर व स्कॅनर असा एकूण अकरा लाख १९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच या प्रकरणाची व्याप्ती कर्नाटकपर्यंत पसरली असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी व पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
या प्रकरणातील मुख्य संशयित आंबाजी सुळेकर हा पासर्डे येथे राहण्यास असून, त्याचे कोपार्डे (ता. करवीर) येथील सांगरुळ फाटादरम्यान असणाऱ्या चौकात रबरी शिक्के, झेरॉक्स, लॅमिनेशनचे दुकान आहे, तर राजूभाई लवंगे हा किराणा मालाचे दुकान चालवतो. येथील कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या ९ बनावट नोटा भरल्याप्रकरणी साईनगर येथील आयुब खुतबुद्दीन रमजान याच्यावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने या नोटा कोल्हापुरातील एका उद्योजकाकडून मिळाल्याचे सांगितले. तसेच ती रक्कम आयुब याचा मेहुणा उस्मान शेख (रा. लक्ष्मीतीर्थ वसाहत) या रिक्षाचालकाने आणून दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी शेख याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीत उस्मान लक्ष्मीपुरी परिसरात रिक्षा लावत होता. तेथे राजूभाई लवंगे हा किराणा माल खरेदीसाठी येत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. दरम्यान, रमजान याच्यासाठी आणलेली ३० हजार रुपयांची रक्कम पूर आल्याने उस्मान याने आपल्याकडेच ठेवली होती. त्यातील पाच हजार रुपये उस्मान याने खर्च केले होते. लवंगे याच्याकडून उस्मान याचे पाच हजार रुपये येणे होते. ते आल्यानंतर रमजान यांचे ३० हजार रुपये उस्मान याने परत दिले. त्यामुळे बनावट नोटा लवंगे याच्याकडून आल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असतात त्याने आंबाजी सुळेकर याच्याकडून पाच हजार रुपयांमध्ये ४० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आणल्याचे कबूल केले.
त्यानुसार पोलिसांनी सर्व सूत्रे गतिमान करत सांगरुळ परिसरात दुकान असलेल्या आंबाजी सुळेकरपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्याला बनावट नोटा व नोटा तयार करण्याच्या साहित्यासह ताब्यात घेतले. संशयितांनी नोटा खपविण्यासाठी दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले होते. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्यानुसार आंतरराज्य पातळीवर पोलिसांचा तपास सुरू आहे.
फोटो ओळी
१२०८२०२१-आयसीएच-०३
बनावट नोटा छपाईप्रकरणी साडेदहा लाख बनावट नोटा व नोटा तयार करण्याच्या साहित्यासह शिवाजीनगर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली.
(छाया : उत्तम पाटील)