कोल्हापूर : शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३१ किलो १३० ग्रॅम गांजा, कारसह सुमारे ९ लाख ८७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित रमेश दादासो शिंदे (वय ४४, रा. विक्रमनगर दुसरा स्टॉप) व समाधान मारुती यादव (२९, रा. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक संजय गोर्ले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजय गुरखे व पोलीस नाईक महेश गवळी यांना काल, बुधवारी राजारामपूरी पोलीस ठाणे हद्दीतील राजाराम तलाव जवळ काही तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचला होता.यावेळी दोघे तरुण संशयितरित्या आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे गांजाचा साठा आढळला. पोलिसांनी या दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील ३१ किलो १३० ग्रॅम गांजा, कारसह सुमारे ९ लाख ८७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या तस्करीच्या टोळीमध्ये आणखी काही गुन्हेगारांचा सहभाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Crime News kolhapur: गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 1:54 PM