कोल्हापूर : गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारी आलिशान मोटार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने पुणे ते बंगळुरू महामार्गावर तावडे हॉटेलसमोर अडवली. या कारवाईत दोघा तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून सुमारे ३ लाख ९३ हजार ६०० रुपयांचे मद्य व मोटारकार असा सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारवाईत, योगेश धनाजी गायकवाड (वय ३०, रा. क्रांतीनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), विनोद उद्धव पाटकर (३०, रा. लोहार गल्ली, कुरुल, ता. मोहाळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने दिलेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेलनजीक उचगाव (ता. करवीर) परिसरातून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काल, बुधवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने महामार्गावर उचगाव परिसरात सापळा रचला.यावेळी एक आलिशान मोटार संशयावरून अडवली. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याने भरलेले १८० मिलीचे विविध कंपन्यांचे ५० बॉक्स असे सुमारे ३ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीचे मद्य व मोटारकार असा एकूण सुमारे १७ लाख ३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत योगेश गायकवाड, विनोद पाटकर यांना अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी साथीदार सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्या दिशेने उत्पादन शुल्क विभागाचा तपास सुरू आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक गिरीषकुमार कर्चे, विजय नाईक, जवान सचिन कळे, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिवगारे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक पी. आर. पाटील करत आहेत.
Crime News: विदेशी मद्य तस्करी करणाऱ्या दोघांना कोल्हापुरात अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 3:57 PM