गारगोटी : मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथे गर्भनिदान चाचणी करताना पकडलेला संशयित विजय लक्ष्मण कोळस्कर हा पोलिस कोठडीत आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यात एका इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरचा समावेश आहे.गुरुवारी रात्री पोलिसांनी डॉ. बाबुराव दत्तू पाटील (वय ५२, रा. बामणे, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि सागर शिवाजी बचाटे (वय ३९, रा. सोनाळी, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांना अटक केली. पोलिसांनी दोन दिवसात मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.विजय लक्ष्मण कोळस्कर याच्या घरी सापडलेले गर्भनिदान यंत्र हे त्याच्या जुन्या बोगस डॉक्टरने दिले आहे. सध्या तो डॉक्टर जिवंत नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. ज्या यंत्राद्वारे बेकायदेशीर लिंग तपासणी करत होता, त्यासाठी लागणारी औषधे ही डॉ. बाबुराव पाटील हे लिहून देत असत. तालुक्यातील काही औषध दुकानांतील कामगार ही औषधे पुरवत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घराच्या झडतीमध्ये गर्भनिदान यंत्र, गर्भनिरोधक गोळ्या, गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारी औषधे सापडली आहेत.आजपर्यंत त्यांनी शेकडो गरोदर मातांना तपासले असल्याची शक्यता आहे. त्यांची आर्थिक उलाढाल ही कोटींची उड्डाणे घेणारी असल्याने किती नवजात बालकांच्या गळ्याचा घोट आईच्या उदरात घेतला, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास गतिमान केला. या तपासात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Kolhapur News: गर्भलिंग निदानप्रकरणी दोघे अटक, एका इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:17 PM