कोल्हापूर : गडहिंग्लज येथील तरुणाचे अपहरण करून साडेपाच तोळ्यांचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन २० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. २८) सायंकाळी उचगाव येथील उड्डाणपुलाजवळ सापळा रचून ही कारवाई केली.प्रवीण विलास मोहिते (वय २९, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) आणि लखन बाळकृष्ण माने (३५, रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून लुटीतील दागिने पोलिसांनी हस्तगत केले.मित्राचे अपहरण करून खंडणी उकळण्याची सुपारी ओंकार दिनकर गायकवाड (रा. हणमंतवाडी, ता. गडहिंग्लज) आणि सुनीता ऊर्फ शनया प्रकाश पाटील (रा. बाळेघोल, ता. कागल) या दोघांनी वीरेंद्र संजय जाधव (रा. राशिंग, जि. बेळगाव) याच्यामार्फत दोन सराईत गुन्हेगारांना दिली होती. २३ सप्टेंबरला योगेश साळुंखे याचे गडहिंग्लज येथील एका हॉटेलमधून अपहरण करून अनोळखी तिघांनी त्याच्याकडील साडेचार तोळ्यांची सोन्याची चेन आणि दीड तोळ्यांची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली होती. तसेच २० लाखांची खंडणी दिली नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. साळुंखे याच्या फिर्यादीनुसार गडहिंग्लज पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघांना २६ सप्टेंबरला अटक केली. मात्र, सुपारी घेणारे पसार झाले होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार वैभव पाटील यांना संबंधित गुन्ह्यात राजारामपुरी येथील प्रवीण पाटील आणि उचगावमधील लखन माने या सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. ते दोघे पुणे-बंगळुरू महामार्गावरील उचगाव उड्डाणपुलाजवळ येणार असल्याचे समजताच शनिवारी सायंकाळी सापळा रचून दोघांना अटक केली. अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार संतोष बरगे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, प्रवीण पाटील, आदींच्या पथकाने कारवाई केली.दोघे सराईतअटकेतील मोहिते आणि माने हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर गांधीनगर आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी त्यांचा ताबा गडहिंग्लज पोलिसांकडे देण्यात आला.
Kolhapur: गडहिंग्लजमधील तरुणाच्या अपहरणप्रकरणी सुपारी घेणारे दोघे अटकेत, साडेपाच तोळे दागिने हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 3:46 PM