कोल्हापूर : मोक्क्यातील गुन्ह्यात विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून यादवनगरात साद शौकत मुजावर (वय २७, रा. सरनाईक वसाहत, यादवनगर, कोल्हापूर) याच्यावर एम. एम. टोळीतील चौघांनी गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. रविवारी (दि. २१) रात्री अकराच्या सुमारास झालेल्या हल्ल्यानंतर दोन तासांत पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली. त्यांच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. सद्दाम सत्तार मुल्ला (वय ३०) आणि साहील रहीम नदाफ (वय २२, दोघे रा. यादवनगर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री सरनाईक वसाहतीत घराबाहेर कट्ट्यावर बसलेला साद मुजावर याच्यावर चौघांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या भिंतीवर लागल्या, तर एक गोळी मुजावर याच्या मांडीत लागली. याचवेळी एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने मुजावर याच्या डोक्यात हल्ला केला. नागरिकांची गर्दी जमताच हल्लेखोरांनी पलायन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने हल्लेखोरांना अटक करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयित हल्लेखोर सद्दाम मुल्ला आणि साहील नदाफ या दोघांना यादवनगरातून अटक केली. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल त्यांच्याकडून जप्त केले. जखमी साद मुजावर याने फिर्याद दिली. गुन्ह्यातील आणखी दोन संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, यादवनगरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
साक्ष दिल्याचा रागराजारामपुरी पोलिसांनी एम. एम. टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यात साद मुजावर हा साक्षीदार आहे. विरोधात साक्ष दिल्याचा राग एम. एम. टोळीला होता. याच रागातून एम. एम. टोळीचे सदस्य त्याच्या मागावर होते. त्याचा गेम करण्यासाठीच हल्लेखोर पोहोचले होते. मात्र, जीवावर आलेले मांडीवर बेतले.
जखमीच्या प्रकृतीत सुधारणाजखमी साद मुजावर याच्या मांडीत घुसलेली गोळी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढली. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.