कोल्हापूर : पत्रकार असल्याची बतावणी करुन शासकिय सेवेत नोकरीचे अमिष दाखवून दोघांना दहा लाखाला गंडा घालणार्या हुपरीतील ठकसेनाला करवीर पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. निखील चंद्रकांत घोरपडे (वय २७ रा. चिटणीस चौक बाजारपेठ, महादेव मंदीरनजीक, हुपरी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता शनिवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव (ता. करवीर) येथील पोवार कॉलनीत एक माजी सैनिक राहतात, त्यांच्या घरी निखील घोरपडे हा संशयीत दोन वर्षापूर्वी भाडेकरु म्हणून राहत होता. त्याने पत्रकार असून माझे मुंबईत रेल्वेत वरिष्ठ अधिकारी ओळखीचे आहेत असे सांगून त्यांचा वि्श्वास संपादन केला. मुलाला नोकरीला लावण्यासाठी त्याने माजी सैनिकांकडून ५ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांनी दि. २ जून ते ५ सप्टेंबर २०१९ दरम्यान संशयीत घोरपडेला रोख, चेकने, फोन पे द्वारे असे एकूण ४ लाख ७६ हजार रुपये दिले. संशयीताने फिर्यादी माजी सैनिक व त्याच्या मुलाचे काम न करताच विश्वास घात करुन तो कोठेतरी निघुन गेला. माजी सैनिकांनी फसवणुक झाल्याबाबत करवीर पोलीस ठाण्यात दि. २७ जून २०२१ रोजी तक्रार दिली, त्यानुसार घोरपडे याच्यावर गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, पीरवाडी, वाशी (ता. करवीर) येथील तरुणास पोलीस आयुक्त कार्यालयात नोकरीस लावतो म्हणून त्याचाही विश्वास संपादन करुन संशयीत घोरपडे व त्याचे साथीदार अनिकेत कासार (रा. कोल्हापूर) व उदय देसाई (रा. ठाणे शहर) यांनी सप्टेंबर त आजपर्यत विवीध ठिकाणी ५ लाख ८९ हजार २०० रुपये घेतले. त्याने त्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार फिर्यादीने करवीर पोलीस ठाण्यात दिली, त्यानुसार तिघां संशयितावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय गुरव यांनी या प्रकरणात संशयीत निखील घोरपडे याला अटक केली.
सहायक पोलीस उपनिरीक्षकपदाचे बनावट नियुक्तीपत्र
पिरवाडी येथील युवकांकडून घोरपडे याने रक्कम घेऊन त्या युवकास ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर तातडीने नियुक्ती झालेबाबतचे बनावट आदेशाचे पत्र दिले.