शहापूर : येथील स्क्रॅप व्यापाऱ्याचा ट्रकमधून नेलेला माल परस्पर विक्री करून फसवणूक केलेल्या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली. कुंडलिक तुकाराम भराटे (रा. गंभीरवाडी ता. कळंब जि. उस्मानाबाद ) व संतोष शंकर उगडे (रा.वाशीगाव जि. उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हा प्रकार २८ जूनला घडला होता.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, किशोर शिवाजी गोसावी (रा. जयसिंगपूर) यांचा शहापूर येथील पुरोहित प्लाझा येथे गोडाऊन आहे. तेथून त्यांनी वरील संशयितांना ट्रकमधून ११ टन स्क्रॅप सुमारे चार लाख रुपये किमतीचे भरून जालना येथे पोहोचवण्यासाठी सांगितले होते. परंतु वरील दोघांनी परस्पर संगनमत करून स्क्रॅपची विल्हेवाट लावून चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.