कोल्हापूर : पासपोर्ट व्हिसाशिवाय घुसखोरी मार्गाने प्रवेश करून दोन बांगलादेशी नागरिक नागदेववाडी (ता. करवीर) येथे अनधिकृत वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आल्याने दोन महिलांना करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सुमन राधेश्याम वशिष्ठ उर्फ राधा उर्फ हमिदा बेगम (वय ३८) आणि खुशी शहाबुद्दीन भुया शेख (वय २५, दोघीही मूळ रा. सोनारगाव, जिल्हा नारायणगंज, बांगलादेश, सध्या रा. साई मंदिर, नागदेव कॉलनी, नागदेववाडी (ता. करवीर) अशी त्याची नावे आहेत.या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाच्या सोलापूर युनिटच्या सहायक पोलिस निरीक्षक शिल्पा यमगेकर यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले की, संशयित दोघी नागदेव कॉलनी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित १८ डिसेंबर, २०२३ पासून नागदेव कॉलनी येथे राहत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय त्यांनी भारतात प्रवेश केला आहे.त्यासह भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी देशात प्रवेश केल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्या घरातून पॅनकार्ड, दोन मोबाइल, आधारकार्ड, रेशनकार्ड जप्त केले आहे. संशयित दोघींच्यावर विदेशी व्यक्ती आणि पारपत्र प्रवेश अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
Kolhapur: दोन बांगलादेशी महिलांना नागदेववाडीत केली अटक, पासपोर्ट, व्हिसाशिवाय वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:31 PM