सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरकरांच्या हौसेचे मोल नाही, असे महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात म्हटले जाते. त्यात वाहनप्रेम तर सर्वश्रुत आहे. कोळेकर तिकटी येथील व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक असलेल्या नीलेश कोंडेकर यांनी आपला सहा वर्षाचा मुलगा श्रेयसवरील प्रेम व त्याच्या हट्टापोटी चक्क मोटारसायकल तयार केली आहे.करवीरकरांचे गाड्यांवरील प्रेम जगभरात प्रसिद्ध आहे. त्यात गाडी कुठल्याही मेड अर्थात बनावटीची असो ती दुरुस्तीसाठी अवघड काम असेल तरीही ते शक्य करून दाखविणे हे येथील मेकॅनिकांचे विशेष कौशल्य आहे.यासह मुलांवरील प्रेमापोटी किंवा गाडी शौकिनांपोटी गाडी कोटीची असो वा लाखाची ती दारात हवीच. मग त्यासाठी कितीही मोजावे लागले तरी चालतील, असा भाव केवळ येथेच पाहण्यास मिळतो. यासह परदेशी बनावटीप्रमाणे देशी गाडीही जशीच्या तशी बनवून दाखविणेही येथेच पाहण्यास मिळते म्हणून या नगरीतच जगविख्यात मर्सिडीज, रोव्हर अशा गाड्यांचे स्पेअर पार्टस् तयार केले जातात. अशाच नगरीत अनेक मेकॅनिक असे आहेत की त्यांना एखाद्या गाडीचे इंजिन, पार्ट दाखविला की त्याप्रमाणे ते बनविण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे.अशाच मातीतून तयार झालेल्या कोळेकेर तिकटी येथील नीलेश कोंडेकर या दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकने त्याचा सहा वर्षाचा मुलगा श्रेयस याच्यावरील प्रेमापोटी गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत तीन फूट लांबीची व ४८ सीसी क्षमतेची दुचाकी बनवली आहे. यासाठी त्याला १० हजार रुपये खर्च आला आहे. ही मोटारसायकल रस्त्यावर फिरविण्यासाठी तयार केली नसून केवळ मैदानातच फेरफटका मारता यावा याकरिता गतीही कमी केली आहे.मोटारसायकलसाठी एक फुटाचे टायर, डिस्क ब्रेक, विशिष्ट चॅसी, चेनड्राईव्ह, क्लच वेट, हे सर्व अल्टरनेट केले आहेत. अॅक्सिलेटरही विशिष्ट प्रकारचा केला आहे. त्यामुळे गतीही मर्यादितच राहणार आहे. इंजिनही हॉक्सा अर्थात लाकूड कापायचे मशीन अल्टरनेट केले असून ते पेट्रोल टू स्ट्रोक आहे. संपूर्ण मोटारसायकलसाठी दहा हजार इतका खर्च आला आहे.मुलगा श्रेयसने सायकल पाहिजे म्हणून हट्ट धरला होता. मग मी त्याला मोटारसायकल तयार करून देतो, असे बोळवण करण्यासाठी सांगितले होते; पण त्याने हट्टच धरला. मग मी अशा प्रकारची मोटारसायकल तयार केली. लहानपणापासूनच वाहतूक सुरक्षिततेचेही धडे मला त्याला देता येतील, या उद्देशाने ही मोटारसायकल बनविली आहे.- नीलेश कोंडेकर, दुचाकी मॅकेनिक
पुत्रप्रेमापोटी बनवली चक्क दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:41 AM