कोल्हापूर : जिल्ह्यात ‘रेमडेसिविर’ या जीवनरक्षक इंजेक्शनचा तुटवडा भासत असतानाच अवघ्या साडेपाच हजार रुपयांचे हे इंजेक्शन काळ्या बाजाराने १८ हजार रुपयाला विकणारे रॅकेट कोल्हापुरात उघडकीस आले. रॅकेटमधील दोघांना मंगळवारी पहाटे कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी अटक केली. योगीराज राजकुमार वाघमारे (वय २४, रा. मनुमाया अपार्टमेंट, सासने मैदान, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मूळ गाव- समर्थ नगर, करुल रोड, मोहळ, जि. सोलापूर) व पराग विजयकुमार पाटील (वय २६, रा. गणेश कॉलनी, कसबा बावडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ‘रेमडेसिविर’च्या ११ बाटल्या जप्त केल्या. आणखीन एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून पोलीस त्याला शोधताहेत.
कोरोना महामारीच्या काळात जीवनदायी ठरलेल्या ‘रेमडेसिविर’ या जीवनरक्षक इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी पथकासह अन्न व औषध प्रशासनाकडील दोन अधिकाऱ्यांनी सासणे मैदान परिसरात "मनुमाया" इमारतीत छापा टाकून योगीराज वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेल्या रेमडेसिविर औषधाच्या तीन बाटल्या मिळाल्या. पाठोपाठ तेथे आलेला त्याचा साथीदार पराग पाटील यालाही अटक करून त्याच्याकडून आठ रेमडेसिविरच्या बाटल्या जप्त केल्या. अशा एकूण अकरा बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
तिप्पट दराने विक्री
इंजेक्शनच्या पॅकवर साडेपाच हजार रुपये छापील किंमत आहे. पराग पाटीलकडून ते इंजेक्शन ९५०० रुपयांना योगीराज वाघमारे खरेदी करून ती तो काळ्याबाजारात १८ हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती समोर आली.
वैद्यकीय शिक्षण व मेडिकल शॉपीची नोकरी
अटकेतील योगीराज वाघमारे हा सावर्डे (ता. हातकणंगले) येथे बी ए एम एस च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. पराग पाटील हाही राजारामपुरीतील एका हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये सेल्समन म्हणून नोकरी करत आहे.
मुंबई, पुणे, दिल्लीपर्यंत रॅकेटची शक्यता
रॅकेट मुंबई, पुणे, दिल्लीपर्यंत असण्याची शक्यता असून इंजेक्शन विक्री रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले. हे रॅकेट मुंबई, पुणे, दिल्लीपर्यंत पोहोचल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. रॅकेटमध्ये सहाजण गुंतल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही रॅकेटने काळ्या बाजाराने रेमडेसिविर विकल्याचीही माहिती पुढे आली. नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठवले. औषध निरीक्षक सपना घुणकीकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फोटो नं. २००४२०२१-कोल-कोरोना आरोपी
ओळ :
कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळ्या बाजारात भरमसाट किमतीत विक्री करणारे योगीराज वाघमारे व पराग पाटील यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. त्यांच्याकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा जप्त केला. (छाया: आदित्य वेल्हाळ)
===Photopath===
200421\20kol_7_20042021_5.jpg
===Caption===
ओळ : कोल्हापूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळ्या बाजारात भरमसाठ किंमतीत विक्री करणारे योगीराज वाघमारे व पराग पाटील यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. त्यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जप्त केला. (छाया: आदित्य वेल्हाळ)