कोल्हापूर : मटका किंग सलीम यासीन मुल्ला याच्याशी कोल्हापूर ते मुंबई कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाल्याप्रकरणी मुंबईतील बोरिवली ईस्टमधील दोघा मटकाचालकांना ‘मोक्का’ कारवाईखाली राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित जयेश शेवंतीलाल शहा (वय ५४), शैलेश गुणवंतराव मणियार (६०) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पुणे विशेष ‘मोक्का’ न्यायालयात हजर केले असता १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत. चौकशीमध्ये सलीम मुल्लाचे कोल्हापूर ते मुंबई कनेक्शन आढळून आले. कोल्हापुरातून मटका घेऊन तो मुंबईतील मटकाचालक जयेश शहा व शैलेश मणियार यांना पुरवीत होता. मुल्ला थेट मुंबईतून मटक्याची सूत्रे हलवीत असल्याने त्याचा कोल्हापूर-कर्नाटक सीमाभागात मटका जोमात सुरू होता. पोलीस उपअधीक्षक कट्टे यांनी या गुन्ह्णाच्या मुळापर्यंत जाऊन शहा व मणियार यांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांचे मुंबईसह राज्यभर मटक्याचे बुकी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आता मटक्याच्या मुळापर्यंत पोहोचल्याने राज्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.सलीम मुल्ला कनेक्शन पडले महागातसंशयित सलीम यासीन मुल्ला, त्याचा भाऊ फिरोज मुल्ला, जावेद मुल्ला, अभिजित अनिल येडगे, नीलेश दिलीप काळे, राजू यासीन मुल्ला, सुंदर रावसाहेब दाभाडे, पिंपू ऊर्फ सलमान आदम मुल्ला (सर्व रा. यादवनगर), शरद देवासराव कोराणे (रा. वेताळ तालीम परिसर, शिवाजी पेठ), मेघराज यच्चाप्पा कुंभार (रा. रंकाळा परिसर), सुरेश जयराम सावंत (रा. साईराज कॉलनी, साने गुरुजी वसाहत), राकेश अग्रवाल, तोफिक शिकलगार, विजय मारुती सांगावकर (सर्व रा. इचलकरंजी), आदींसह २८ जणांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुल्ला याच्याशी मटक्यातील कनेक्शन बुकीचालकांना चांगलेच महागात पडले आहे.