राजाराम लोंढे -- कोल्हापूर --स्थानिक नेत्यांसह दूध उत्पादकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शाखा नंबर दोन आता अधिकृत करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) काढले आहेत. या संस्थांना मेअखेर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून आतापर्यंत जिल्ह्यातून दोन नंबर शाखांचे ७५ प्रस्ताव सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे दाखल झाले आहेत. सर्वेक्षणात चारशे दूध संस्था अवसायनात निघाल्याने ठरावाच्या राजकारणासाठी संचालकांनी शाखा नंबर दोन नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘गोकुळ’ दूध संघाशी संलग्न दूध संस्था सुमारे चार हजार आहेत. ठरावाच्या राजकारणातून एकाच गावात पाच-सहा संस्थांची नोंदणी केली गेली. दूध संस्था नोंदणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा निकष रोज २५० लिटर दूध संकलन करणे, हा आहे. अनेकजण दुधाचा कोटा एकदमच पूर्ण करून नोंदणी करतात. त्याचबरोबर गटांतर्गत राजकारणातून संस्थेत फूट पडली तर दुसऱ्या संस्थेला परवानगी मिळाली नाही तर, संघाने ‘शाखा नंबर दोन’ हा पर्याय काढला होता. राजकारणातून इतर संघाला दूध जाऊ नये, यासाठी ‘गोकुळ’ने पळवाट शोधली आहे. गेले पंधरा ते वीस वर्षे ‘गोकुळ’मध्ये ‘शाखा नंबर दोन’चा पॅटर्न राबविला जात आहे. जिल्ह्णात शंभराहून अधिक ‘शाखा नंबर दोन’ कार्यरत आहेत. सहकार खात्याने संस्थांचे शुद्धिकरण मोहीम हातात घेऊन सर्वेक्षण पूर्ण केले. त्यामध्ये चारशेहून अधिक दूध संस्थांना अवसायनात काढल्या आहेत. निवडणुकीच्या ठरावासाठी कागदोपत्री असणाऱ्या संस्थांवर सहकार विभागाने कारवाई सुरू केली आहे. संचालकांच्या हक्काच्या संस्था अवसायनात गेल्याने ठरावाचा गठ्ठा कमी होणार, या भीतीने आता ‘शाखा नंबर दोन’ नोंदणीकृत करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. ‘गोकुळ’ची वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ गटाला घाम फुटला होता. त्यात हक्काच्या चारशे संस्था अवसायनात निघाल्याने त्याचा परिणाम संघाच्या आगामी निवडणुकीवर होईल, याची भीती संचालकांना आहे. त्यात या शाखांचे पदाधिकारी हे संचालकांशी संबंधितच आहेत. या संस्थांना मेअखेर नोंदणीकृत केले तर संघाच्या पुढील निवडणुकीत या संस्था मतदानासाठी पात्र ठरू शकतात. त्यासाठी संचालकांनी धडपड सुरू केली आहे. आता पर्यंत ७५ प्रस्ताव सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे आले असून आणखी प्रस्ताव येत आहेत. 'सहकार'च्या नियंत्रणाअभावी जोखीमही अधिकदुसऱ्या संस्थेची शाखा काढून तिथे दूध संकलन करण्यास ‘गोकुळ’ परवानगी देते. संघाच्या सुविधा या शाखेतंर्गत येणाऱ्या उत्पादकाला मिळतात पण सहकार खात्याचे नियंत्रण नसल्याने जोखीमही जास्त आहे.
दूध संस्थांच्या दोन नंबर शाखा अधिकृत होणार
By admin | Published: April 25, 2016 12:38 AM