कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून दोघा भावांनी तिच्यासह पतीची चाकूचे वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना सिद्ध झाल्याने दोघा सख्ख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक-४) एस. पी. गोंधळे यांनी दोषी ठरवत शुक्रवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.गणेश महेंद्र पाटील (वय २५), जयदीप महेंद्र पाटील (वय २४, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. निकालाची माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी दिली. ऑनर किलिंगची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याची टिपण्णी सरकारी वकिलांनी केली. खुनाची घटना डिसेंबर २०१५ मध्ये घडली होती. या खुनाची फिर्याद एका महिलेने दिली होती.या घटनेची हकीकत अशी, आरोपींची बहीण मेघा (वय २१) हिने सावर्डे, ता. पन्हाळा येथील इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय २३) याच्याशी २०१४ आंतरजातीय प्रेमविवाह केला. घरच्याचा विरोध पाहून त्यांनी सावर्डे, ता. पन्हाळा येथून कोल्हापुरातील कसबा बावड्यातील गोळीबार मैदानाजवळील गणेश काॅलनीत भाड्याने खोली घेतली. मेघा हिने ताराबाई पार्कातील एका माॅलमध्ये नोकरी मिळवली. या माॅलमध्ये तिला भावाने एकदा पाहिले. त्यावेळी लग्नाबाबत त्याने नाराजी व्यक्त केली. आरोपी गणेश व जयदीप यांना गावामध्ये बहिणीच्या प्रेमविवाहावरून लोक विचारतात व चेष्टा करतात, हे त्यांना आवडले नव्हते. त्यामुळे दोघे भाऊ-बहिणीवर चिडून होते.१६ डिसेंबर २०१५ ला मामाच्या लग्नाचे निमित्त साधून दोघे बाहेर पडले. त्यांनी बहीण व तिच्या पतीला ठार मारण्याचा कट रचला. यात नितीन रामचंद्र काशीद (रा. थेरगाव) याची मदत घेतली. तिघेही एकाच मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी आले. त्यातील आरोपी काशीद हा बाहेर टेहळणी करीत उभा होता. आरोपी गणेश व जयदीप बहीण मेघाच्या घरी गेले. त्यांनी तिला चहा करण्यास सांगितला. चहासाठी दूध आणण्यासाठी तिचा पती इंद्रजित गेला.
यादरम्यान दोघा भावांनी तिच्यावर चाकूने वार केला. तिचा मृतदेह खोलीतील मोरीत ठेवला. थोड्या वेळाने तिचा पती दूध घेऊन आल्यावर दोघांनी त्याच्यावरही अनेक वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे फिर्यादी महिला त्या खोलीकडे गेल्या. मात्र, त्यांना काशीदने धक्का मारून पळ काढला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.तत्कालीन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी तपास केला. खटल्याची सुनावणी तत्कालीन सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांच्यासमोर झाली. त्यांची बदली झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंधळे यांच्यासमोर झाला. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी याकामी १६ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. साक्षीदारांनी दिलेले साक्ष व ॲड. शुक्ल यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी गणेश पाटील व त्याचा भाऊ जयदीप पाटील यांना ३०२ कलमाखाली दोषी ठरवून आजन्म कारावास, १० हजार रुपये दंड, तो न दिल्यास एक वर्षे सक्तमजुरी सुनावली.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नाबद्दल तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, तो न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. यातील तिसरा आरोपी नितीन काशीद यास गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल न्यायालयाने तीन वर्षे सहा महिने सक्तमजुरी व पाच हजारांचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी सहायक फौजदार सुरेश परीट, निवृत्त हवालदार लक्ष्मण लोहार, सहायक फौजदार शाम बुचडे यांनी तपासकामी मदत केली.