नूल : खेळता खेळता पाय घसरून नदीच्या पडल्याने श्रीराज हरिशचंद्र पाटील (वय ३) व अथर्व हरिशचंद्र पाटील (वय ५) या दोन बालकांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. नूल (ता. गडहिंग्लज) येथे गुरुवारी (१३) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, अश्विनी हरिशचंद्र पाटील या गुरुवारी सकाळी आपल्या श्रीराज व अथर्व या दोनही मुलांना घेऊन नदीकडील शेतावर गवत आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेतात खेळत असणारी दोन्ही मुले नदीकडे गेली.
दरम्यान, खेळताना मुलांचा पाय घसरून दोन्ही मुले नदीच्या पाण्यात पडली. मुले नदीत बुडत असल्याचे लक्षात येताच अश्विनी हिने नदीत उतरून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांना वाचविण्यात तिला अपयश येऊ लागल्याने तिने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून नदीकाठावरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या सर्वांना बाहेर काढले. मात्र, मदतीसाठी गेलेल्यांना केवळ मातेला वाचविण्यात यश आले.
पोलीस पाटील परशराम सरनाईक यांच्या फिर्यादीवरून घटनेची गडहिंग्लज पोलिसांत नोंद झाली आहे.
-----------------------
* अश्विनी यांच्यापुढे दु:खाचा डोंगर !
नूल येथील मारुती फुटाणे यांची मुलगी अश्विनी यांचे आठ वर्षांपूर्वी करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील हरिशचंद्र पाटील यांच्याशी विवाह झाला होता. वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे दोन्ही मुलांसह मोलमजुरी करून त्या नूलमध्ये रहात आहेत. पतीच्या निधनानंतर वर्षभरात दोनही मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे अश्विनी यांच्यासमोर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
----------------------
तिघांविरुद्ध गुन्हा
दरम्यान, श्रीराज व अथर्व यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर त्याची वर्दी पोलिसांत न देता दोघांच्या मृतदेहावर करंबळी (ता. गडहिंग्लज) येथे परस्पर अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी दुंडाप्पा कृष्णा पाटील, अजित दुंडाप्पा पाटील (दोघे रा. करंबळी) व मारुती भिमा फुटाणे (रा. नूल) यांच्याविरुद्ध हलकर्णी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------
* अश्विनी पाटील : १३०५२०२१-गड-०७
* मृत - श्रीराज पाटील : १३०५२०२१-गड-०८
* मृत - अथर्व पाटील : १३०५०२१-गड-०९