- दत्ता पाटील
म्हाकवे : म्हाकवे (ता कागल) येथील श्रीपती ज्ञानू पाटील यांनी जनावरांना उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी लावलेल्या पंख्याच्या तांत्रिक बिघाडामुळे गोठ्यातील लोखंडी खांबातून शॉक उतरुन दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पाटील कुटुंबीयांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीपती पाटील यांचा म्हाकवे आणूर मार्गावर जनावरांचा गोठा आहे. उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी गोठ्यामध्ये सिलिंग पंख्याची सोय केली आहे. आज दुपारी बारा वाजता ते वैरण टाकून घरी आले होते. यावेळी पंखा सुरूच होता. तांत्रिक बिघाडामुळे हा पंखा जळून त्याचा शॉक लोखंडी खांबात उतरला. यामध्ये दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला. याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.
लाकडी खांबामुळे तीन जनावरे बचावली या गोठ्यामध्ये चार गायी व एक लहान पाडी होती. यापैकी दोन गायींच्यामध्ये लोखंडी खांब होता.तर त्यांच्या लगत असणार्या गायीनजीक लाकडी खांब आहे. यामुळे तीन जनावरे बचावली आहेत. याबाबत उपस्थित ग्रामस्थांतून चर्चा सुरू होती.