किणी : किणी (ता. हातकंणगले) येथे शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन गवे महामार्गालगतच्या नागरी वस्तीत शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या ऊसातून जुना महामार्ग ओलांडून अजित पाटील यांच्या घरामागील रिकाम्या जागेत पहाटे हे गवे आले होते. पुण्याहून गावात परतणाऱ्या संजय चाळके यांच्या गाडीच्या आडवे गेल्याने त्यांनी कुणाची तरी जनावरे सुटली असतील, असे समजून गाडी थांबवून जवळ राहणाऱ्या शीतल पाटील व इतरांना कल्पना दिली. मात्र, याची खातरजमा केली असता, ते गवे असल्याचे लक्षात आले. काही वेळानंतर लोकांची चाहुल लागताच दोन्ही गवे माघारी फिरून किसान पाणी पुरवठा इमारतीजवळ ऊसतोडणीनंतर रिकाम्या झालेल्या शेतामधून महामार्ग ओलांडून तळसदेच्या दिशेने माघारी गेले.
नेहमीच प्रचंड वाहतूक असणारा पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग व जुना महामार्ग ओलांडून गावात गवे आले कसे, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या गव्यांची माहिती वन विभागाला कळ्वली असता, वनपाल एस. एस. जाधव, डी. ए. खंदारे, आय. सी. जाधव यांनी घटनास्थळाला भेट देत ठशांची पाहणी करून तळसदेच्या दिशेने गवे माघारी फिरल्याचे सांगितले.
ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने या कालावधीत गव्यांचा नैसर्गिक अधिवास बदलत असतो. त्यामुळे गवे इतरत्र भटकत असतात. गवे दिसल्यावर नागरिकांनी वन विभागाला कळवावे जेणेकरुन गव्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात पाठवता येईल, असे आवाहन करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी केले आहे.
फोटो : ०८ किणी गवे, किणी (ता. हातकंणगले) येथे नागरी वस्तीत शनिवारी पहाटे शिरलेले गवे व गव्यांच्या पायाचे ठसे.