समीर देशपांडेकोल्हापूर : एकीकडे शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य साहाय्यक यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती आहे; मात्र पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी शिक्षक मुख्यालयी राहत नसून, त्यांना गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन कोटी दोन लाख ९१ हजार ७६७ रुपये इतका निवासी भत्ता अदा करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकाराखाली रामचंद्र करले (रा. पिसात्री, ता. पन्हाळा) यांनी ही माहिती मागविली होती.
वरील प्रवर्गाच्या ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना ते सेवा करत असलेल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्वांची सेवा ही थेट गावपातळीवरील ग्रामस्थांशी संबंधित असून, ती अत्यावश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कर्मचारी गावात राहत असल्याबाबतचा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र अनेक कर्मचारी असा ठराव कागदोपत्री जोडत असून, शक्यतो ते तालुक्याच्या किंवा पंचक्रोशीतील मोठ्या गावामध्ये राहत असतात, ही वस्तुस्थिती आहे. जिल्हाभर हीच परिस्थिती आहे.
असे असताना मग पन्हाळा तालुक्यातील किती शिक्षकांवर घरभाडे भत्ता खर्च पडतो, अशी माहिती रामचंद्र्र करले यांनी मागितली होती. त्यानुसार ती माहिती त्यांना देण्यात आली आहे. या माहितीनुसार मार्च २0१९ ते सप्टेंबर २0१९ या सहा महिन्यांमध्ये वरील रक्कम घरभाडे भत्त्यापोटी खर्च पडल्याचे कळविण्यात आले आहे. यातील अनेक शिक्षक कोल्हापूरमध्ये बंगले बांधून राहत असताना मग खोटे दाखले देऊन घरभाडे भत्ता का उचलला जातो, हाच खरा प्रश्न आहे.
याला शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे अभय असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर खोटारडेपणा करून निधी उचलला जात असताना त्याला आक्षेप कसा घेतला जात नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शासननिर्णय, जोडले जाणारे दाखले आणि दिला जाणारे घरभाडे भत्ता याचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी काही धोरणात्मक निर्णय घेणार का, हाच खरा प्रश्न आहे.
- पन्हाळा तालुक्यात केंद्रवार अदा करण्यात आलेला घरभाडे भत्ता
- केंद्रनिहाय माहिती-कंसात घरभाडे भत्ता रक्कम
- कोलोली-(१४ लाख ९७ हजार ३६१ रुपये),
- दळवेवाडी-(४ लाख ६३ हजार ४०८),
- पडळ - (१५ लाख २३ हजार ५१५),
- पन्हाळा-(६ लाख ९६ हजार २४४),
- पुनाळ -(११ लाख ६८ हजार ७८१),
- पैजारवाडी-(१२ लाख ११ हजार २४८),
- पोहाळे/ बोरगाव- (९ लाख ४३ हजार ६१८),
- बाजार भोगाव- (७ लाख ९७ हजार २६),
- चव्हाणवाडी- ( १० लाख २८ हजार १४८),
- राक्षी-(१३ लाख ६२ हजार ७८१),
- वाघवे-(९ लाख ५८ हजार ९९६),
- वाघुर्डे-(१० लाख ३१ हजार ९६१),
- वेतवडे-(९ लाख ७२ हजार १३८),
- सातवे-(१२ लाख ७३ हजार २९३),
- आसुर्ले-(१५ लाख ७९ हजार १३७),
- कोडोली-(१७ लाख ८३ हजार ६३२),
- काळजवडे - (८ लाख ३ हजार ४४६ ),
- कळे - (११ लाख ९७ हजार ३४ रुपये )
एकूण-दोन कोटी दोन लाख ९१ हजार ७६७ रुपये.