कोल्हापूर : रंकाळा तलावातील प्रदूषित पाणी स्वच्छ झाले पाहिजे, या भूमिकेतून मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेने हाती घेतलेल्या संशोधनास मदत म्हणून राज्य सरकार दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे केली. मुंबई उपनगर परिसरातील तलाव शुद्धिकरणाची मोहीमही या संस्थेने हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेने सुरू केलेल्या रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मंत्री तावडे यांच्या हस्ते झाला. यावेळी तावडे यांनी संस्थेच्या संशोधनाची माहिती घेतली. तसेच रंकाळा तलावाजवळील खणीची त्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. शोध अनेक लागतात; पण ते प्रयोगशाळेत राहतात किंवा शोधनिबंधातच राहतात. त्याला काहीच अर्थ राहात नाही. त्याचा समाजाला काही उपयोग होत नाही. परंतु, रंकाळा शुद्धिकरणाचा प्रयोग हा सर्वसामान्य जनतेसाठी केला जात असून, तो प्रत्यक्षात यशस्वी झाला आहे. ज्यावेळी प्रयोग यशस्वी होतात, तेव्हा लोकसहभाग वाढतो. म्हणूनच रंकाळा तलाव शुद्धिकरणाच्या पुढील प्रयोगास राज्य सरकार नगरविकास, शिक्षण विभाग किंवा जिल्हा नियोजन मंडळातून दोन कोटी रुपयांचा निधी देईल. याबाबत मी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर लवकरच बोलणार आहे, असे मंत्री तावडे म्हणाले. संस्थेने शाहूंच्या काळात होते तसे रूप रंकाळा तलावास मिळवून द्यावे. सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत तलाव स्वच्छ होईल. परंतु, आता यापुढे तलावात मिसळणारे सांडपाणी थांबविण्याची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारावी, असेही तावडे म्हणाले.यावेळी विजय कुंभार, प्रभाकर तांबट यांनी तलावातील पाण्यावर सुरू असलेल्या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले. अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, के. एस. चौगुले, महेश जाधव, नेताजी पवार, प्रसाद मंत्री, आर्किटेक्ट असो.चे राजेंद्र सावंत, मदन चव्हाण, सुहास इंगवले, पांडुरंग इंगवले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती सांगितली. रंकाळा तलाव, पंचगंगा नदी शुद्धिकरण करण्यास केंद्र सरकारकडून निधी मिळेल. परंतु, निधीपेक्षा इच्छाशक्ती पाहिजे. आम्ही रंकाळा तलाव शुद्धिकरणाची भूमिका याच इच्छाशक्तीच्या जोरावर घेतली आणि त्यास निधीही मिळाला, असे सांगत आमच्या या संशोधनास महानगरपालिकेने सहकार्य करावे, असे आवाहन यादव यांनी केले.
रंकाळा शुद्धिकरणासाठी दोन कोटींचा निधी
By admin | Published: June 27, 2016 12:06 AM