लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने १५ ते ३० मे दरम्यान शनिवार-रविवारी असे दोन दिवसाचा ऑनलाइन राज्यस्तरीय बुद्धिबळ पंचांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यानंतर सहा जून रोजी परीक्षा घेऊन वर्गवारी करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन संघटनेने तालुका व जिल्हा पातळीवर जास्तीत जास्त सक्षम पंच निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण व परीक्षा मराठी-इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून दिले जाणार आहे. यात
महाराष्ट्रातील तज्ज्ञ आंतरराष्ट्रीय व फिडे पंचांकडून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
हे शिबिर राज्यातील बुद्धिबळ स्पर्धांमधील व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी आयोजित केले आहे. तरी या संधीचा बुद्धिबळप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले यांनी केले आहे. कोल्हापुरातील खेळाडू आणि प्रशिक्षकांनी जिल्हा सचिव भरत चौगुले यांच्याशी संपर्क साधावा.