कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांत अंतिम सत्र, वर्षाच्या सुमारे २७,३९३ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा (मॉक टेस्ट) दिली आहे. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली. अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून पुन्हा या परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.विद्यापीठाकडून अंतिम सत्र, वर्षाची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. त्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने ही सराव परीक्षा विद्यापीठाने आयोजित केली आहे. ५०,५२७ विद्यार्थ्यांपैकी २७,३९३ विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. १६), शनिवारी (दि. १७) सराव परीक्षा दिली.
विद्यार्थ्यांकडून उपस्थित केलेल्या त्रुटी, त्याचबरोबर अन्य काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याच्या निराकरणासाठी कॉल सेंटरमार्फत ३० हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. दरम्यान, ऑनलाईन परीक्षेसंदर्भात विद्यापीठाने निर्माण केलेल्या विशेष कॉल सेंटरमार्फत शनिवारी दिवसभरात सुमारे २७०० विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.
पी.आर.एन. क्रमांकांसंदर्भात सुमारे १५०० विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर केल्या. त्याचप्रमाणे मोबाईल रेंजच्या अडचणीमुळे ८०० विद्यार्थ्यांना पासवर्ड प्राप्त होत नव्हते, ते त्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.सामान्यज्ञानावरील प्रश्नांनी गोंधळया सराव परीक्षेत शुक्रवारी विज्ञान विद्या शाखेच्या परीक्षेला ५० टक्के प्रश्न मराठीतून आणि अभ्यासक्रमाबाहेरील विचारण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली होती. त्यावर विद्यापीठाने सराव परीक्षा ही संगणक प्रणालीतील सर्व बाबी समजण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली आहे. ती विषयनिहाय नसून, सामान्यज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांचा प्रणालीत समावेश असल्याचा खुलासा केला आहे; पण अंतिम सत्रातील परीक्षा असताना सामान्यज्ञानावरील प्रश्न कसे, असा सवाल काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.