निपाणी : गोव्याहून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार्या साईभक्तांच्या स्विफ्टकारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोनजण ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी अक्षयनगर क्रॉसवर आज, बुधवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. संदेश मुळगावकर (वय २७, रा. गोवा) याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रोहण ºहाटवळ (३४, रा. गोवा) याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला. केजपॉल फर्नांडिस, गोपाळ बोचडी आणि अशोक बांदेकर (सर्व रा. गोवा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्यातील हे मित्र सर्वजण स्विफ्टकारने (जीए ०३ पी ९९९१) शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. निपाणी येथे आल्यानंतर आश्रयनगर क्रॉसवर आंध्र प्रदेशहून नागरपूरकडे जाणार्या ट्रकला (एपी ०२ टीए ६४८८) कारने जोराची धडक दिली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यावेळी पुढे बसलेला संदेश मुळगावकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चालक रोहण याचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच फौजदार धिरज शिंदे, हवालदार आनंद पांडव, एस. एस. चिकोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघातप्रकरणी ट्रकचालक बाबू (रा. आंध्र प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. निपाणी शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
मोटार अपघातात गोव्याचे दोन ठार, तीन गंभीर
By admin | Published: June 05, 2014 1:06 AM