कोल्हापूर : एएस ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स, एलएलपी या कंपनीच्या विविध योजनांच्या नावाने मोठ्या रकमा स्वीकारून चार कोटी ६२ लाख १५ हजार ४५२ रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांविरोधात पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यातील दोन संशयितांना पोलिसांनी गुरुवारी (दि. ११) अटक केली. याबाबतची फिर्याद प्रकाश महालिंग खंकाळे (रा. धायरी, सिंहगड, पुणे) यांनी दिली. प्रदीप मड्डे (रा. लोणावळा) व संतोष वाजे (मावळ, पुणे) असे त्या दोघांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, खंकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एएस ट्रेडर्स ॲण्ड डेव्हलपर्स या कंपनीचे मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार, पुणे कंपनीचे संचालक अमर चौगुले, भिकाजी कुंभार, बाबूराव हजारे, विजय पाटील, आदिनाथ पाटील, प्रदीप मड्डे (रा. लोणावळा), पुणे जिल्हा फ्रॅन्चाईजी संतोष वाजे (मावळ, पुणे) या संशयितांनी मोठे परतावे, महागड्या गाड्या, बक्षिसे दाखवून, विदेशात सहलीला नेण्याचे आमिष आणि विविध योजनांच्या नावे गुंतवणूकदारांचे पैसे जमा केले. यात काही दिवस परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कोणतीही रक्कम परत न देता गुंतवणूकदारांची चार कोटी ६२ लाख १५ हजार ४५२ रुपये परत न देता फसवणूक केली. यातील प्रदीप मड्डे, संतोष वाजे या संशयितांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. याबाबतचा गुन्हा संबंधितांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, तपास पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर करीत आहेत. कोल्हापुरातही याच कंपनीने हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हे दाखल झाले असले तरी, संशयितांना अटक झालेली नाही.
एएस ट्रेडर्सच्या दोघा संचालकांना पुण्यात अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:21 AM