कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन बँकेच्या गाळा विक्री प्रकरणात जबाब बदलण्यास नकार दिल्यानेच कर्मचारी सुनील मोरे व संजय वाळके यांना संचालक मंडळाने निलंबित केल्याची माहिती उदय मिसाळ यांनी पत्रकातून दिली आहे. दरम्यान, गाळा विक्रीत ६५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह सोळा जणांवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. कोल्हापूर अर्बन बँकेने हॉटेल महाराजाला दोन कोटी कर्ज दिले होते. थकीत कर्जापोटी बॅँकेने चार गाळे ताब्यात घेऊन त्याची लिलाव प्रक्रियेने सुनील मोरे, संजय वाळके या कर्मचाऱ्यांसह विजय कदम यांना हे गाळे विक्री करण्यात आले. मोरे व वाळके यांनी गाळ्यांचे पैसे बँकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा केले होते; पण त्याचा जमा खर्च ताळेबंदला दिसत नसल्याने आपण तक्रार केल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशीअंती अध्यक्ष नामदेवराव कांबळे, शिरीष कणेरकर, शिवाजीराव कदम, पी. टी. पाटील, बॅँकेचे तत्कालीन अधिकारी अनिल नागराळे, बाजीराव खरोसे, माधव चव्हाण यांच्यासह सोळा जणांवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मोरे व वाळके यांनी आपण रोखीने ३५ लाख रुपये बॅँक अधिकाऱ्यांना दिल्याचे पोलीस तपासात जबाब दिला आहे. याबाबत दि. १७ मे रोजी न्यायालयात सुनावणी आहे. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी आपले जबाब बदलावेत यासाठी संचालकांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे; पण मोरे व वाळके यांनी जबाब बदलण्यास नकार दिल्यानंतर संबंधितांना निलंबित करण्यात आले आहेत.
दोन कर्मचारी निलंबित
By admin | Published: May 16, 2016 1:42 AM