कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन शनिवारी होत आहे; परंतु एकाच दिवशी व एकाच वेळेला म्हणजे सहा वाजता दोन वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कार्यक्रमांचे एकाच ठिकाणी आयोजन करण्यात आल्याने पानसरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांतील दुहीचे प्रदर्शन होत आहे. पानसरे यांच्यावर वैचारिक श्रद्धा असणारा व दोन्ही व्याख्यात्यांना ऐकायला येणारा वर्ग एकच असतानाही एकाच वेळेला हे कार्यक्रम होत असल्याने लोकांचीही अडचण होणार आहे.
श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने दिलीप पवार, एस. बी. पाटील, व्यंकाप्पा भोसले, प्रा. उदय नारकर, मेघा पानसरे, रसिया पडळकर यांनी पुढाकार घेऊन एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविशकुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. त्याची घोषणा अगोदरच झाली आहे. “भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध” या विषयावर ते व्याख्यान देतील. ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हा कार्यक्रम ६ ते ८ या वेळेत आहे. शाहू स्मारक भवनमध्ये त्याचे लोकांसाठी थेट प्रक्षेपणही आयोजित केले आहे. रविशकुमार ६ ते ७ अशी एक तास मांडणी करणार आहेत.
डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार याची त्याचदिवशी सायंकाळी ६.३० वाजताच दसरा चौकात जाहीर सभा होणार असल्याची माहिती गिरीश फाेंडे यांनी बुधवारी पोलिसांनी सभेस परवानगी दिल्यावर घाईगडबडीत पत्रकार परिषद घेऊन दिली. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असतील. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, माजी आमदार मालोजीराजे, जेएनयूमधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक प्रमुख उपस्थित राहणार आहेत. रविशकुमार यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता दसरा चौकातील मैदानावर कन्हैयाकुमार याची सभा होणार असल्याचे फोंडे यांनी सांगितले असले तरी तोपर्यंत श्रमिक प्रतिष्ठानचा कार्यक्रम होणार नाही आणि एकाच वेळेला शाहू स्मारकमध्ये व स्मारकाबाहेर असे दोन कार्यक्रम सुरू राहिल्यास ऑनलाईन कार्यक्रमात त्याचा व्यत्यय येऊ शकतो.
फोटो : गोविंद पानसरे यांचा संग्रहित वापरावा
फोटो : १७०२२०२१-कोल-रविशकुमार
फोटो : १७०२२०२१-कोल-कन्हैयाकुमार