तानाजी पोवारकोल्हापूर : तारुण्याच्या उंबरठ्यावरील दोन मैत्रिणी, शाळेतील परीक्षेत गुण कमी मिळाले, पालक रागावतील या भीतीपोटी घरातून गुपचूप बाहेर पडल्या. मुंबईला जायचे, व्यवसाय करायचा अन् तेथून ‘कोरिया’ गाठायचे. तेथे मोठा व्यवसाय करायचा, अशी त्यांची स्वप्ने; पण पालकांनी वेळीच पोलिसांचा दरवाजा ठोठावला अन् पोलिसांचे शोधकाम सुरू झाले.कोल्हापूर शहर व उपनगर परिसरातील अवघ्या १५ वर्षांच्या संबंधित दोघी मैत्रिणी, एकाच शाळेत शिकतात. दोघींनाही चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले. घरी पालक रागावणार या भीतीपोटी त्यांनी गुणपत्रिका घरी दाखविलीच नाही; पण शुक्रवारी दुपारी क्लासला जातो म्हणून दोघीही घरातून बाहेर पडल्या. वेळेत घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली.मदतीसाठी पोलिसांचा दरवाजा ठोठावला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसही सतर्क झाले. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे, सहायक पोलीस निरीक्षक दीपिका जौदाळ, तसेच ‘डायल ११२’वरील पोलीस नाईक कृष्णा पाटील व पोलिसांची वाहने पालकांना घेऊन शोधमोहिमेत सुसाट धावली.रात्री सव्वाआठला त्या दोघी कोल्हापुरात रेल्वेस्थानकावर आढळल्या. पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गेले आठ दिवस ऑनलाइनवर माहिती मिळवून त्यांनी व्यवसायासाठी कोरियाला जायचे नियोजन केले. तत्पूर्वी, रेल्वेने मुंबईत जायचे असे स्वप्न असल्याचे दोघींनी पालकांसमोर पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघींची समजूत काढून पालकांच्या स्वाधीन केले.अवघ्या तीन तासांत त्या सापडल्या. मात्र पोलिसांकडून थोडा जरी वेळ झाला असता तर त्या मुंबईला निघून गेल्या असत्या अन् ते कोवळे जीव नको त्याच्या हाती पडून दिशाहीन झाले असते. राजारामपुरी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे पंधरा वर्षांच्या त्या दोघींना शुक्रवारी रात्री शोधून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.घरातून घेतले ५० हजार रुपयेदोघींनी बाहेर पडताना घरातून खर्चासाठी ५० हजार रुपये घेतले. त्यातून रेल्वेने मुंबईला जाण्याच्या त्या तयारीत असताना पोलिसांनी रेल्वेस्टेशनवर त्यांना ताब्यात घेतले.ऑनलाइन मुंबईत भाड्याने घर बुकपासपोर्ट म्हणजे काय, याचे ज्ञानही नसणाऱ्या या दोघींनीही कोरियाला जाण्याची स्वप्ने पाहिली. तत्पूर्वी, मुंबईला जायचे ठरविले. दोन दिवसांपूर्वी मुंबईत राहण्यासाठी ऑनलाइन घरही भाड्याने बुकिंग केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
परीक्षेत कमी गुण मिळाले, भीतीपोटी 'त्या' दोघींनी सोडलं घर; स्वप्नं ‘कोरिया’ गाठण्याचं मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 2:50 PM