हुपरी : रेंदाळ (ता.हातकणंगले ) येथील पूजा बबन दानोळे (वय १४)या मुलीने पुणे येथे पार पडलेल्या १४ व्या जायंट स्टार केन (एम टी बी )राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्य स्पर्धेत व जमखंडी (कर्नाटक )येथे आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग अजिंक्य स्पर्धेत टाईम ट्रायल प्रकारामध्ये विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांक मिळवीत या मुलीने केवळ १४ वर्षे वयात दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तीच्या या यशस्वी कामगिरीबद्दल परिसरातून तीचे कौतुक होत आहे .
पूजा हिला अगदी लहान वयापासुनच खेळांची जास्त आवड आहे .त्यातही तिला सायकलिंग हा प्रकार सर्वात जास्त आवडतो .तीचे वडील बबन दानोंळे एक नामवंत मल्ल म्हणून परिसरात परिचित आहेत .त्यामुळे घरातूनच तिला खेळासाठी आपोआपच प्रोत्साहन मिळत आहे .कुटुंबीयांनी तिची सायकलिंगची विशेष आवड ओळखून तिला लहानपणापासुनच प्रेरणा देण्यास सुरुवात केली .
सायकलिंग मध्ये तिला चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे तसेच तिने विशेष प्राविण्य मिळवावे या उद्देशाने कुटुंबीयांनी तिला पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातील तज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सरावासाठी पाठविले आहे .या सरावाच्या कालावधि दरम्यानच पूजाने थेट राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होवून आपल्यातील उत्कृष्ट व नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन घडवित चमकदार कामगिरी करीत विशेष प्रावीण्यासह अवघ्या 14 व्या वर्षी तब्बल दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे .पूजाला वडील बबन दानोंळे ,आजोबा बजरंग दानोंळे ,चुलते सचिन दानोंळे आदींचे प्रोत्साहन मिळाले आहे.