कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील वारे वसाहतमधे दोन गटात झालेल्या सशस्त्र राड्यात चार जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सुमारे एक तासभर हा राडा सुरू होता. हल्लेखोरांनी तलवार गुप्ती, एडका, काठ्या आदी प्राणघातक हत्यारांचा खुलेआम वापर करत दहशत माजवली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पृथ्वी विलास आवळे (वय 20), सुजल कांबळे (21), दादासो किशोर माने (30) रूपाली विलास सावळे (४०, सर्व रा.वारे वसाहत, संभाजी नगर कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पृथ्वी आवळे याच्या पाठीत धारदार शस्त्राचे खोलवर वार झाल्याने तो अत्यवस्थ आहे. त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, चार दिवसापूर्वी एका कॉलेजवर ट्रेडिशनल डे साजरा झाला. यावेळी तेथे साऊंड सिस्टिम लावण्यावरून वारे वसाहतीतील दोन गटाच्या युवकात वादावादी झाली होती. या घटनेचे पडसाद आज, शनिवारी दुपारी वारे वसाहत मध्ये उमटले. एका गटाच्या पंधरा ते वीस जणांनी हातात तलवारी सारखी धारदार शस्त्रे घेऊन संजय आवळे यांच्या घरावर हल्ला केला. घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून पृथ्वी आवळे या युवकाला भोसकले. युवकांनी परिसरात प्रचंड गोंधळ घालत दहशतीचे वातावरण केले.
यावेळी आवळे गटातील समर्थक एकत्र आले. त्यानंतर दोन्ही गटात सशस्त्र राडा झाला. सुमारे तासभर हा राडा सुरू होता. हल्यात दोन्ही गटांतील महिलांचाही मोठ्या संख्येने समावेश होता. या हल्ल्यात चार जण जखमी झाले. सुजल आवळे व पृथ्वी आवळे यांना खोलवर जखमा झाल्या. घटनेनंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी जखमींना सीपीआरमध्ये रकतबंबाळ अवस्थेत दाखल केले. त्यावेळी सीपीआर मध्येही दोन्ही समोरासमोर आले. त्यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीस फौजी आवारात अगोदर हजर असल्याने त्यांनी दोन्ही गटाच्या समर्थकांना पिटाळून लावले. काही वेळानंतर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष जाधव हे घटनास्थळी आले.