कोल्हापूर : उंचेपुरे, तगडे व्यक्तिमत्त्व असलेले ७४ वर्षीय हिंदकेसरी दीनानाथसिंह हे गेल्या तीन महिन्यांपासून प्रोस्टेट ग्रंथींची वाढ आणि फुप्फुसातील रक्ताच्या गाठीने त्रस्त आहेत. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रोस्टेट ग्रंथींबाबत शस्त्रक्रिया करण्यास त्यांना डॉक्टरांनी सांगितले. मात्र, गेल्या १७ महिन्यांपासून राज्य शासनाकडून निवृत्तिवेतन मिळाले नसल्याने या शस्त्रक्रियेचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभारला आहे. ‘हिंदकेसरी’ची गदा पटकावून कोल्हापूरचा नावलौकिक देशपातळीवर करणाऱ्या दीनानाथसिंह यांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात हवा आहे.उत्तर प्रदेशमधील कुत्तुपूर या गावातील मध्यमवर्गीय कुटुंबांतील दीनानाथसिंंह हे कुस्तीमध्ये करिअर करण्यासाठी कोल्हापूरला आले. या कुस्तीपंढरीतील सराव आणि तयारीच्या जोरावर अनेक कुस्ती मैदानांत यश मिळवित त्यांनी कोल्हापूरचा नावलौकिक केला. कुस्तीतील निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावाला जाण्याऐवजी त्यांनी आपली कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरातच राहण्याचा निर्णय घेतला आणी ते कोल्हापूर, राज्य आणि देशाच्या कुस्ती क्षेत्रातील एक अविभाज्य अंग बनले. मात्र, गेल्या पाच महिन्यांपूर्वी कुत्तुपूर येथील कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त जाऊन आल्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला. वातावरणातील बदलामुळे त्रास होत असल्याच्या समजातून त्यांनी काही दिवस औषधे, गोळ्या घेतल्या; पण काही फरक पडला नाही. त्यांना धाप लागण्याचे प्रमाण वाढले. त्यावर आॅगस्टच्या अखेरीस त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन-तीन दिवसाच्या उपचारांनंतर ते घरी परतले. पुन्हा त्यांना गेल्या आठवड्यात त्रास सुरू झाला. त्यावर रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या डाव्या फुप्फुसात रक्ताच्या दोन गाठी असल्याचे आणि प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याचे निदान झाले.रक्ताच्या गाठीवरील उपचार झाल्यानंतर महिन्याभरात प्रोस्टेट ग्रंथींची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आतापर्यंत वैद्यकीय उपचारासाठी सव्वादोन लाख रुपये खर्च झाले असून, पुढील शस्त्रक्रिया आणि औषधांसाठी साधारणत:६० हजार रुपये खर्च होणार आहेत. कुस्ती क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाºया हिंदकेसरी दीनानाथसिंह यांना या आजारपणाच्या खर्चासाठी आर्थिक मदतीचा हात हवा आहे.मदतीची गरजराज्य शासनाकडून गेल्या १७ महिन्यांपासून बाबांना निवृत्तिवेतन मिळालेले नाही. आम्ही केलेली बचत सध्या वैद्यकीय उपचारांसाठी खर्च झाली आहे. त्यामुळे आर्थिक मदतीची गरज असल्याचे अभयसिंग यांनी सांगितले.
प्रकृती अन् परिस्थितीशी ‘हिंदकेसरीं’चे दोन हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 1:03 AM