सचिन लाड -- सांगली -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सांगलीतही वाहनधारकांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. विनाहेल्मेट वाहन चालविण्याबद्दल दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. पण तरीही वाहनधारक हेल्मेट वापरण्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे आता नवीन वाहन घेतानाच वाहन विक्रीच्या शोरुममधून प्रत्येकी दोन हेल्मेट देण्याची सक्ती करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) दशरथ वाघुले यांनी वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून, राज्यात प्रत्येक वाहनधारकाने हेल्मेट घातले पाहिजे, असा आदेश काढला आहे. या आदेशाची सर्वत्र अंमलबजावणी सुरु झाली आहे. आरटीओ व वाहतूक शाखा यांनी नुकत्याच पार पडलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात, हेल्मेट घालणे कसे फायद्याचे ठरु शकते, याची माहिती उदाहरणासह शाळा, महाविद्यालयांत, तसेच कॉर्नर सभा घेऊन दिली होती. पण वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात चार हजार दोनशे अपघात झाले आहेत. यामध्ये साडेपाच हजारहून अधिक लोक गंभीर जखमी झाले, तर साडेअठराशे जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येकवर्षी जिल्ह्यात साधारणपणे सव्वातीनशे ते साडेतीनशे जणांना अपघातात प्राण गमवावा लागत आहेत. अपघात झाला की, संबंधित व्यक्ती डोक्यावरच पडते. डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू होतो. ९० टक्के लोकांचा मृत्यू हा हेल्मेट नसल्यामुळेच झाल्याचे मत आतापर्यंतच्या निष्कर्षातून नोंदविण्यात आले आहे.जिल्ह्यात प्रत्येकवर्षी तीन लाखाहून अधिक दुचाकी नव्याने रस्त्यावर येत आहेत. वाहन खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. वाहनासाठी हजारो रुपये मोजले जातात. मात्र त्यासोबत स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घेण्यासाठी त्यामानाने किरकोळ हजार-बाराशे रुपये खर्च केले जात नाहीत. दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घातलेच पाहिजे. हेल्मेट वापरणे ही सक्ती नसून, तशी कायद्यात तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा असली तरी, वाहनधारकांनीही स्वत:च्या सुरक्षेसाठी त्याचा वापर करायला हवा. यासाठी आरटीओ वाघुले यांनी जिल्ह्यातील दुचाकी वाहने विक्री करणाऱ्या शोरुमचालकांना वाहन विकताना संबंधित ग्राहकास दोन हेल्मेटची विक्री करण्याचे नवे धोरण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हेल्मेट घेतल्याशिवाय नवीन वाहन पासिंग करायचे नाही, असाही त्यांनी निर्णय घेतला आहे. नव्यानेच हा उपक्रम सांगली जिल्ह्यासाठी राबविण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई : परवानाही होणार निलंबितहेल्मेट न घालता प्रवास करणे धोक्याचे असल्याचे वाढत्या अपघातांच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दुचाकीस्वारांच्या चुकीमुळे किंवा समोरून येणाऱ्या वाहनधारकाच्या चुकीमुळे अपघात होतात. हेल्मेट घातल्यानंतरही अपघात झाल्यास उपचारानंतर जीव वाचू शकतो. मात्र हेल्मेट नसताना डोक्याला दुखापत झाल्यास मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट घालणे फायद्याचे आहे. जे वाहनधारक हेल्मेट घालणार नाहीत, त्यांच्यावर शंभर रुपये दंडात्मक कारवाई होत आहे. दंड किरकोळ असल्याने वाहनधारक भरून निघून जातात. यासाठी आता वाहतूक शाखेने अशा वाहनधारकांचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओंकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.महिन्याला किमान ८० ते ९० रुग्ण अपघातातील येतात. यातील एकही रुग्ण हेल्मेट घातलेला नसतो. अपघातात डोक्याला मार लागलेल्या रुग्णांचे ९० टक्के प्रमाण आहे. हेल्मेट घातले होते, तरीही डोक्याला लागले आहे, असा आजपर्यंत एकही रुग्ण आला नाही.- डॉ. शरद सावंत, विश्रामबागवाहनधारकांनी कारवाई करण्याची वेळ आणून देऊ नये. हेल्मेट घालण्याबाबत सातत्याने जनजागृती केली आहे. वाहन चालविणारा प्रत्येक नागरिक सूज्ञ आहे. त्यामुळे त्यांनी आता ते वापरायला हवे. न वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे. - दादासाहेब चुडाप्पा, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.]सांगलीत जनजागृती मोहीमही सुरू होणार...हेल्मेटची सक्ती नसून, तशी कायद्यातच तरतूद व दुचाकीस्वाराच्या सुरक्षेसाठी ते महत्त्वाचे आहे. अपघातानंतर पहिला मार डोक्यालाच लागतो. यासाठी प्रवासात डोक्यावर हेल्मेट असणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली.
वाहन घेतानाच मिळणार दोन हेल्मेट!
By admin | Published: February 09, 2016 12:04 AM