कोल्हापूर : होमगार्डकडून उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी होमगार्ड कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी गुन्हा दाखल करीत अटक केली.
अनिकेत संताजी सरनाईक (वय २३, होमगार्ड सनद क्रमांक १२४१, शहर पथक, शाहू कॉलनी, मंगळवार पेठ) व नीलेश विठ्ठल सुतार (२६, सनद क्र. १५९३, शहर पथक, हनुमान गल्ली, टेंबलाईवाडी) या दोघांचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी बुधवारी ही माहिती दिली.यातील तक्रारदारही होमगार्ड आहे. त्याला तीन उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्र व पुनर्नियुक्तीसाठी कार्यालयाने रीतसर अर्ज भरून कागदपत्रे सादर करण्यासाठी कळविले होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने आवश्यक ती कागदपत्रे सादरही केली.
त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या इमारतीमधील होमगार्ड कार्यालयातील कार्यालयीन कामकाज करणारे होमगार्ड सरनाईक व सुतार यांनी तक्रारदाराला तीन वर्षे उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी २५०० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे शुक्रवारी (दि. १७) तक्रार केली.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, हेड कॉन्स्टेबल मनोज खोत, विकास माने, नवनाथ कदम, मयूर देसाई यांनी केली.
लाचलुचपत विभागामार्फत चौकशी केली जाणार पुर्ननियुक्ती व उत्कृष्ठ सेवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अडीच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी होमगार्ड कार्यालयातील संबधितांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी केली जाणार आहे. अशी माहीती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी दिली.