कोल्हापूर : बनावट नोटा तयार करून त्या व्यवहारात आणण्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. विश्वास आण्णापा कोळी (वय 27 रा. आलास, ता. शिरोळ) व जमीर अब्दुलकादर पटेल ( वय 32, रा. बीगी कनवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरोळ व कुरूंदवाड परिसरात 2000, 200 व 100 रुपयांच्या बनावट नोटा व्यवहारात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संजय मोहिते व अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना ही माहिती दिली व याचा तपास करण्यास सांगितले. या करिता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास पथक तयार केले.दरम्यान, विजय केरबा कारंडे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात बनावट नोटाबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी विश्वास कोळी व जमीर पटेल या दोघांना वळीवडे रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर विश्वास याने आपणच बनावट नोटा करत असल्याची कबूली दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन हजार रुपयांच्या 75 नोटा, 200 रुपयांच्या 177 नोटा व 100 रुपयांच्या 638 नोटा अशी दिड लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या. तसेच त्यांच्याकडील रंगीत प्रिंटर, बॉन्ड पेपर व कात्रीही जप्त करण्यात आले.
कोल्हापुरात अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 6:13 PM