कोल्हापूर : फार्मसी नाही, बिले दिली जात नाहीत, अशा विविध स्वरूपातील तक्रारींवर अन्न व औषध प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोनशे औषध दुकानांना (मेडिकल शॉप्स) कारवाईचा दणका दिला आहे. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० नुसार औषध दुकानांसाठी नियमावली निश्चिती केली आहे. मात्र, काही औषध दुकानांमधील कामकाज याप्रमाणे चालत नसल्याची स्थिती आहे. शिवाय या दुकानांमध्ये फार्मसी नाही, बिले देत नाहीत, रजिस्टर ठेवले जात नाही, याबाबतच्या तक्रारी देखील अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल होतात. तसेच नियमावलीनुसार कामकाज चालते का? हे पाहण्यासाठी या दुकानांची वर्षातून एकदा तपासणी केली जाते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करून फार्मसी नसलेल्या, तसेच नियमांचे पालन करत नसलेल्या सुमारे दोनशे दुकानांवर कारवाई केली आहे. यात परवाने रद्द, काही दिवसांसाठी निलंबन, अशा कारवाईचा समावेश आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात होलसेल आणि रिटेल स्वरूपातील साधारणत: अडीच हजार औषध दुकाने आहेत. त्यांची वर्षातून एकदा तपासणी करण्याचा नियम आहे. परंतु, विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने ते शक्य होत नाही. मात्र, प्राप्त झालेल्या तक्रारी आणि उपलब्ध निरीक्षकांवर तपासणीचे काम सोपवून कारवाई सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत दोनशेहून अधिक दुकानांवर कारवाई केली आहे. ती सुरूच राहणार आहे.- अर्जुन खडतरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागनियमांचे पालन ‘केमिस्ट’ने करणे आवश्यक आहे. कायद्यातील नियमांनुसार असोसिएशनतर्फे सदस्यांना बिले देणे, रजिस्टर ठेवणे, आदींबाबतच्या सूचना दिल्या जातात. त्यादृष्टीने मार्गदर्शन देखील केले जाते. जे त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.- मदन पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन
जिल्ह्यातील दोनशे ‘मेडिकल’ना दणका
By admin | Published: December 27, 2014 12:08 AM