कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व ऊर्जा फौंडेशनतर्फे ज्येष्ठांसाठी घेण्यात आलेल्या मोबाईल साक्षरता प्रशिक्षण शिबिरातून आजअखेर २00हून अधिक ज्येष्ठांनी प्रशिक्षण घेतले.आज, स्मार्टफोन वापरण्याचे ज्ञान असणे अनिवार्यच झाले आहे; परंतु अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन, सोशल मीडिया या गोष्टींचा वापर करता येत नाही. बऱ्याचदा नागरिकांना किरकोळ गोष्टींसाठी अन्य कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. ज्येष्ठांची हीच खंत दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्टफोन साक्षर’ करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक ऊर्जा फौंडेशनतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. आजपर्यंत तीन बॅच पूर्ण झाल्या.त्यामध्ये ज्येष्ठांसाठी दररोज दुपारी चार ते पाच या वेळेत मोफत १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मोबाईलवरून फोन लावणे, नंबर सेव्ह करणे, मेसेज पाठविणे, सोशल मीडियाचा वापर, लाईट बिल भरणे, रेल्वे, एस. टी.चे तिकिट बुकिंग करणे, अशा गोष्टी शिकविल्या गेल्या.तिसऱ्या बॅचमध्ये रियाज शेख, श्रीकांत डिग्रजकर, बाबूराव पोर्लेकर, विलास शहा, कुमुदिनी शहा, शोभा पोर्लेकर, वसंत हिरवडेकर, वसंतराव गुंडाळे, शरद गुळवणी, पांडुरंग कोळेकर, एम. जे. चव्हाण, सुधाकर काशिकर, प्रमोद गिरी, के. डी. गुरव, एस. डी. नार्वेकर, दिलीप जोशी, अर्चना मेंगाणे, चैत्राली पसारे, प्रणोती शेवाळे, यशवंत शेवाळे यांनी मार्गदर्शन घेतले.