कोल्हापूर : मिरचीचा हंगाम सुरू होण्यास अजून महिन्याभराचा कालावधी असतानाच मिरचीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यंदा मिरची सामान्य माणसाच्या जिभेला चांगलाच चटका देणार हे नक्की आहे. फळबाजारात द्राक्षे, कलिंगडांची आवक वाढली असली तरी उठावही त्या प्रमाणात होत आहे. भाजीपाला बाजारात मात्र चढ-उतार दिसत आहे. प्रत्येक वर्षी मार्चनंतर मिरचीचा हंगाम सुरू होता. मार्च ते मे या तीन महिन्यांत मिरचीपूड तयार करून ठेवली जाते; पण पावसाने सगळीकडेच झटका दिल्याने मिरचीचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी बाजारात मिरचीची आवक घटली आहे. कोल्हापुरात साधारणत: कर्नाटकातून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होते. डिसेंबर व जानेवारी महिन्यांत १५० रुपये किलोपर्यंत असणाऱ्या मिरचीने फेबु्रवारीतच दोनशे रुपयांचा टप्पा गाठला आहे. मार्च, एप्रिलमध्ये तर चारशे रुपयांपर्यंत मिरचीचा दर जाईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. साखरेवरील करात शंभर रुपयांची वाढ झाल्याने किरकोळ बाजारातील साखरेचा दर वाढला आहे. किरकोळ बाजारात सरासरी तो ३५ रुपये प्रतिकिलो राहिला आहे. हरभराडाळ प्रतिकिलो ६५, तूरडाळ १५०, तर सरकी तेल ७२ रुपयांवर स्थिर आहे. फळबाजारात सध्या कलिंगडे, द्राक्षांची रेलचेल आहे. काळ्या पाठीच्या ‘किरण’ व ‘मधू’चा दर घाऊक बाजारात ५० ते ४५० रुपये डझन असा राहिला आहे. हिरव्या पट्ट्याचा दर मात्र ५० ते ८५० रुपयांपर्यंत आहे. कोबी, वांगी, ढबू, ओला वाटाणा, भेंडी या भाज्यांच्या दरांत वाढ झाली असून टोमॅटो, गवार, वरण्याच्या दरांत काही प्रमाणात घसरण झाली आहे. यंदा ‘हापूस’ गोड लागणार यंदा आंबा पिकाला पोषक असेच हवामान राहिले आहे. थंडीमुळे आंब्यात चांगला रस तयार होतो, तर कडक उन्हामुळे त्याचा आकार मोठा होण्यास मदत होते. यंदा चांगले हवामान असल्याने फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक सुरू झाली आहे. गुळाच्या दरात घसरण गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, प्रतिक्विंटलच्या दरात शंभर रुपयांची घसरण झालेली आहे; पण एक किलो बॉक्सच्या गुळाला मागणी असल्याने त्याचे दर मात्र स्थिर आहेत. डाळींचे दर पूर्ववत झाले नसले तरी स्थिर आहेत; पण मिरचीने फेबु्रवारी महिन्यातच दोनशे रुपयांचा टप्पा पार केल्याने आगामी तीन महिन्यांत मिरची ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. - संजय नाकील ( व्यापारी)
हंगामापूर्वीच मिरचीने गाठला दोनशेचा टप्पा
By admin | Published: February 08, 2016 12:58 AM