कोल्हापूर : कुणीही उठावे आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खिळा ठोकावा, त्यांच्यावर एखादा बोर्ड लटकवावा.... हे वृक्षप्रेमींसाठी प्रचंड यातनादायी. वारंवार सांगूनही लोक ऐकत नाहीत म्हटल्यावर वृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेने स्वत:च एक शिडी घेतली, पक्कड घेतली आणि शहरात सुरू झाली, जाहिरात बोर्ड व खिळेमुक्त वृक्ष मोहीम.
झाडांच्या बुंध्यातून दोन किलो खिळे निघाले, तर १०० बोर्ड काढून टाकण्यात आले. झाडाभोवतीचे सिमेंटचे कट्टे तर फोडून काढण्यात आले. तरुणांच्या या पुढाकाराने झाडांचा कोंडलेला श्वास पुन्हा एकदा मोकळा झाला आणि वृक्षप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.वृक्षसंवर्धन कायद्यानुसार झाडांवर खिळे मारणे, बोर्ड लटकवणे, त्यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचविणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे; पण याचे पालन सुजाण नागरिक म्हणून कोणीही करत नाही.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे फक्त अभंगापुरतेच राहते. झाडांना मित्र म्हणून कधी वाढवले जात नाही. उलट दिसले झाड की मार खिळा, लटकव त्याला बोर्ड आणि आपल्या उत्पादनाची जाहिरात कर, असे सर्वसाधारण सर्वांचे वर्तन दिसते.कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, बागल चौक या व्यापारी पेठा, तेथे माणसांची वर्दळ तशीच झाडांचीही गर्दी आहे. मोठमोठे वृक्ष अजूनही डौलदारपणे उभे असल्याचे दिसतात; पण या झाडांकडे पाहिले की जाहिरातींचे बोर्ड लावून त्यांचे विद्रूकरण केल्याचेच दिसते.
वारंवार आवाहन करूनही लोक दाद देत नसल्याने वृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेने विशेष मोहीम राबवीत या झाडांचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. परत झाडांना इजा करू नका, असे आवाहनही यावेळी वृक्षप्रेमींनी केले.यात संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, सौरभ कापडी, प्रसाद भोपळे, पारितोष उरकुडे, विकास कोंडेकर, तात्या गोवावाला, शैलेश टिकार, अमित यादव, उदयसिंह जाधव, प्रवीण मगदूम यांनी सहभाग घेतला.