कोल्हापूर : बंद घराच्या खिडकीचे गज तोडून सुमारे दोन लाख १४ हजार ५०० रुपयांच्या धाडसी घरफोडीचा प्रकार करवीर तालुक्यातील वडणगे येथे घडला. घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबविले. अनिल राजाराम सादुलेव (वय ५५) हे दीपावलीनिमित्त वडणगेतील घराला कुलूप लावून कोल्हापुरातील घरी आले असता हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल सादुलेव यांचे वडणगे येथे किराणा दुकानचा व्यवसाय आहे. तसेच ते तेथेच राहण्यासाठी आहेत. दीपावली सणानिमित्त ते घराला कुलूप लावून सहकुटुंब शनिवारी (दि. २१) दुपारी कोल्हापुरात उत्तरेश्वर पेठेतील मूळ घरी काही दिवस राहण्यास आले होते.
सोमवारी (दि. २३) रात्री ते सर्वजण वडणगेतील घरी परतले. त्यावेळी त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून ते वाकवले व आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून दरवाजा उचकटला.आतील सुमारे दोन लाख १४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी इतर तिजोरीतील कपड्यांसह इतर साहित्य विस्कटून टाकले होते. याबाबत अनिल सादुलेव यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.चोरीस गेलेले दागिनेसोन्याचे दागिने : २४ ग्रॅमच्या दोन चेन, ५ ग्रॅमचे लॉकेट, एकूण १५ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, १२ ग्रॅमचे ६ कॉईन, ४ ग्रॅम कानातील डूल.चांदीचे दागिने : एकूण ६४ हजार रुपये किमतीच्या समया, देवांच्या मूर्ती, आरतीचे ताट, भांडी.फोटो नं. २४११२०२०-कोल-चोरी०१,०२