मुरगूड : माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व खासदार संजय मंडलिक यांच्या कार्याचा व विचारांचा वसा व वारसा कृतिशीलपणे चालवीत वीरेंद्र मंडलिक यांची वाटचाल सुरू आहे. त्यांनी वाढदिवस साजरा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दोन लाख रुपये निधी देऊ केला; तसेच वाढदिवस साजरा न करता, शुभेच्छा व डिजिटलवर खर्च न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास निधी देण्याचे आवाहन केले आहे.
मुरगूड शहराच्या वैभवात भर घालणारा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकर उभा राहावा, यासाठी वीरेंद्र मंडलिक यांनी कंबर कसली आहे. लोकवर्गणीसह अशा उपक्रमांतून मोठा निधी उभा होऊन येत्या काही दिवसांत हा वैभवशाली अश्वारूढ पुतळा उभा राहील, असा विश्वास वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंडलिक यांनी व्यक्त केला. शहरवासीयांकडून निधी संकलन सुरू आहे; पण अंदाजे ५० लाख रुपये खर्च येणार असल्याने निधी संकलनामध्ये गती येणे आवश्यक असल्याचे मंडलिक यांनी सांगितले. याशिवाय तालुक्यातील कोणत्याही कार्यकर्त्यांनी वाढदिवशी कोणतेही उपक्रम घेऊ नयेत, बॅनर लावू नयेत. याचा जो खर्च येईल, तो पुतळा संकलन निधीसाठी जमा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.